For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Pipeline: थेट पाईपलाईन उशाला, 488 कोटी खर्चूनही कोरड कोल्हापूरकरांच्या घशाला!

05:28 PM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
kolhapur pipeline  थेट पाईपलाईन उशाला  488 कोटी खर्चूनही कोरड कोल्हापूरकरांच्या घशाला
Advertisement

योजना पूर्ण होऊन वर्षभरातच समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे.

Advertisement

By : विनोद सावंत

कोल्हापूर : थेटपाईपलाईन झाल्यानंतर शहरासह उपनगरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार, मुबलक आणि शुद्ध पाणी विनाखंड मिळणार असे दावे झाले. प्रत्यक्षात योजना सुरु झाल्यानंतर मात्र, अपेक्षाभंग होत आहे. योजना पूर्ण होऊन वर्षभरातच समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे.

Advertisement

यामध्ये पाईपलाईनला गळती, व्हॉल्व खराब होणे, विद्युतलाईन तुटणे, जॅकवेलमधील सिस्टीममधील पार्ट खराब होणे अशा अनेक कारणांनी थेटपाईपलाईनचा पाणीपुरवठा वारंवार बंद झाला आहे. 488 कोटींचा निधी खर्च करूनही कोल्हापूरकर तहानलेलेच असून पाण्यासाठी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

शहरातील पाण्याची समस्या कायमची सोडवावी, मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळावे, या उद्दात हेतूने थेटपाईपलाईन योजना आणली. अनेक संकटे पार करत अडीच वर्षात पूर्ण होणारी योजना तब्बल 9 वर्षाने पूर्ण झाली. योजनेचे थाटामाटात लोकार्पणही झाले.

45 वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले. शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार असे दावेही करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र आहे. 488 कोटी खर्च करुनही शहरातील पाण्याची समस्या काही संपलेली नाही. वारंवार थेटपाईपलाईन योजनेत बिघाड होत असून शहरासह उपनगरावर पाणी संकट निर्माण होत आहे.

महापालिका टँकरने पाणीपुरवठा करत असल्याचा दावा जरी करत असली तरी काही भागात टँकरही येत नसल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे थेटपाईपलाईन योजना सुरू झाल्यानंतर ए, बी आणि ई वॉर्डमध्ये पाण्याची समस्या कमी होण्याऐवजी वाढली असल्याची प्रतिक्रिया आहे. नवीन योजना मग वारंवार बिघाड होतोच कसा?

थेटपाईपलाईन योजना नवीन असल्याने वास्तविक योजनेत बिघाड होता कामा नये. असे असतानाही सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला. यामुळे शहरात चार दिवस पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही मनपा प्रशासनला यावरुन धारेवर धरले.

यामध्येच आता काळम्मावाडी पंपिंग स्टेशनचे मान्सुनपूर्व देखभाल दुरुस्तीसाठी सोमवारपासून दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नवीन योजना आहे मग वारंवार मेंटेनन्स का करावा लागतो. वारंवार बिघाड होतोच कसा असा प्रश्न उपस्थित होत

मनपा प्रशासनाचा दावा

नवीन योजना सेट होण्यासाठी दोन वर्ष कालावधी लागतो. थेटपाईपलाईन योजनेसाठी हायटेक यंत्रणा वापरली आहे. 55 कि.मी. टाकलेली पाईपलाईन चांगली आहे. केवळ व्हॉल्वमध्ये बिघाड होतो. काहीवेळेस व्हॉल्व्ह चोरी झाल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. 27 कि.मी. विद्युतलाईन जंगल क्षेत्रातून आहे. विद्युतलाईन भूमीगतसाठी 19 कोटींची आवश्यकता असून शासनाकडे निधीची मागणी केली आहे.

अभियंताकडे टिपर, वर्कशॉपचा अतिरिक्त भार

पाणीपुरवठा विभागाकडील तांत्रिक कामासाठी 8 अभियंतांची पदे मंजूर असून त्यापैकी एक अभियंतावरच सर्व डोलारा आहे. विशेष म्हणजे कार्यरत असणाऱ्या त्या अभियंताकडे टिपर देखभाल दुरूस्ती, वर्कशॉपचाही चार्ज दिला आहे.

समस्यांची श्रृंखला कायम

शिंगणापूर उपसा केंद्राची दुरुस्ती 46 लाखांच्या निधीतून केली जात आहे. 10 जूनपर्यंत शिंगणापूर उपसा केंद्र सुरू करण्याचे नियोजन होते. परंतू अवकाळी पावसामुळे हे शक्य होऊ शकले नाही. कोल्हापुरात पावसाने उघडीप घेतली असली तरी पुण्यातील कंपनीकडून स्वीच यार्डसाठी लागणारे साहित्य आणले जाणार आहे.

परंतु पुण्यात झालेल्या पावसामुळे साहित्य मिळण्यास अवधी लागत आहे. पुढील आठवड्यात साहित्य मिळेल. काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतील. यानंतरच शिंगणापूर योजना सुरू होईल, अशी माहिती संबंधितांनी दिली आहे.

पर्याय असणाऱ्या जुन्या उपसा केंद्राकडे दुर्लक्ष

थेटपाईपलाईन योजनेला पर्याय म्हणून जुने तीन उपसा केंद्र आहेत. परंतू हे तिन्ही उपसा केंद्र कालबाह्या झाले आहेत. थेटपाईपलाईन सुरू होणार असल्याने महापालिकेने हे उपसा केंद्र अपडेट करण्याकडे दुर्लक्ष केले. नवीन योजना होत असल्योन जुन्या योजनेवर खर्च का करायचा ही भूमिका आता अडचणीची ठरली आहे.

शिंगणापूर योजना बंद आहे. या योजनेतून निम्म्या शहराला पाणीपुरवठा होतो. 110 एमएलडी पाणी उपसा येथून होतो. बालिंगा आणि नागदेववाडी उपसा केंद्र सुरू असून येथून 70 एमएलडी पाणी उपसा केला जातो. येथून सी आणि डी वॉर्डला पाणी दिले जात आहे. मात्र, ए. बी. आणि ई वॉर्डचे परिसर पूर्णत: आता थेटपाईपलाईनवर अवलंबून आहे. ही योजना वारंवार बंद पडत असल्याने येथे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.

विद्युतलाईन भूमिगत का नेली नाही

विद्युतलाईन भूमिगत नसल्याने वादळी पावसात झाडांच्या फांद्या तुटून विद्युतपुरवठा बंद होतो. पक्षी अडकल्यानंतरही विद्युत लाईनमध्ये बिघाड होतो. 488 कोटींच्या खर्चात वास्तविक सर्वच विद्युतलाईन भूमिगत करणे अपेक्षित होते. परंतू 4 किलोमीटरच भूमिगत विद्युतलाईन आहे.

Advertisement
Tags :

.