संततधार सुरूच, वारणेवरील सर्व बंधारे पाण्याखाली,अनेक मार्ग बंद
पन्हाळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस,पडझडीत १ लाख ८० हजाराचे नुकसान
वारणानगर / प्रतिनिधी
गेली तीन दिवस पाऊस सततधार कोसळत आहे यामुळे पन्हाळा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे ६० मि.मी पाऊस पन्हाळा तालुक्यात गत २४ तासात पडला आहे. वारणा नदीवरील चिंचोली, कोडोली,बच्चे सावर्डे,तांदूळवाडी, माणगाव, खोची व शिगाव सह सर्व बंधारे कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वाळोली, बाजार भोगाव, पेंडाखळे, करंजफेण, कुंभेवाडी, सुसकेवाडी, नवलाचीवाडी एक व दोन असे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
वारणेच्या मुख्य पाणी साठा असणाऱ्या वसंत सागर या चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पर्यन्त १४०२ मि.मी. पाऊस पडून धरणात २३.५४ टीएमसी पाणी साठा झाला असून धरणातून नदी पात्रात १३९६ क्यूसेस विसर्ग विद्युत निर्मितीस सुरू केला आहे. पन्हाळा तालुक्यातील कुंभी धरणात १.६३ कासारी धरणात १.९६ टिएमसी पाणीसाठा झाला आहे. तालुक्यात कोल्हापूर सांगलीला जोडणारा बच्चे सावर्डे - मांगले बंधारा पूल पहिल्यांदा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. पोहाळे - बोरगाव ते बाजार भोगाव दरम्यान पुलावर पाणी आल्याने वहातूक बंद केली आहे.
गत २४ तासात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पन्हाळा तालुक्यात पडला आहे याशिवाय कुंभी कासारी या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडू लागला आहे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सातवे, सावर्डे, आरळे, आमतेवाडी, वाळकेवाडी, शिंदेवाडी आदी गावातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
पन्हाळा तालुक्यात माळवाडी(को) येथील आंनदा लखू खोत यांच्या जनावरांच्या शेडची अंशतः पडझड होऊन ५० हजार रुपयांचे नुकसान, बोरपाडळे येथिल आप्पासो भिकाजी पाटील,काकासो शामराव देवकुळे यांच्या घराची भिंत पडझड होऊन प्रत्येकी सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.आंबवडे येथील सुशील केदार पाटील यांच्या घराची भिंत पडझड होऊन सुमारे ३० हजार रुपयाचे नुकसान झाले बाबत महसूल विभागाने नोंद घेतल्याचे तहसिलदार माधवी शिंदे यांनी सांगितले.