Kolhapur News: पुलाची शिरोलीतील पंचगंगेवरील मध्यभागचा पूल राहणार बंद
एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करणे धोकादायक
कोल्हापूर : पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरु आहे. यामध्ये पंचगंगा नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ब्रिटिश कालीन पूल काढून टाकला आहे. तिथे नवीन पुलाचे कामास सुरुवात होणार आहे. शिवाय पूर्वेकडील पूल २००४ साली महामार्गाच्या चौपदरीकरणात पूर्ण झाला आहे.
त्यामुळे मध्यभागी असलेला पूल विस्तारीकरणासाठी आणि दुरुस्ती साठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी या पुलावरील वाहतूक पूर्वेकडील एकाच पुलावरून सुरु ठेवण्यात येईल.
सद्या तावडे हॉटेल, सांगली फाटा (पुलाची शिरोली), नागाव फाटा व शिरोली एमआयडीसीत पुलाची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत पंचगंगा नदीवरील एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करणे धोकादायक व वाहन चालकांना त्रासदायक ठरू शकते.
याचा परिणाम महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागणार आहेत. येणाऱ्या कांही दिवसात नवरात्रीमुळे कोल्हापूरला महालक्ष्मी व जोतिबाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ वाढणार आहे. त्यानंतर
दिवाळी सण आहे. याचा विचार करून महामार्ग प्राधिकरणाने पुलावरील वाहतूक तत्काळ बंद करू नये असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.
तर महामार्गावरील वर्दळ कधीच कमी होणार नसल्याने आठ दिवसांचा वेळ मिळाल्यास आपण दोन्ही पूल सुरळीत सुरू करू शकतो. असा ठाम विश्वास महामार्ग प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. एकूणच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही वाहतूक बंद होणार की नाही? याबाबत संभ्रम आहे. मात्र वाहनधारकांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य करणे अपेक्षित आहे.
स्थानिक वाहनधारकांनी कोल्हापूरातून पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी कसबा बावडा मार्गाचा अवलंब करावा. तर कर्नाटकात गाणाऱ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ मार्गे सरनोबतवाडीकडे जाता येऊ शकते. अशा पर्यायी मार्गाचा अवलंब करून वाहनधारकसुद्धा पंचगंगा नदी पुलावरील वाहतुकीची कोंडी टाळू शकतात. असे महामार्ग प्राधिकरणाचे ठाम मत आहे.
महेश पाटोळे,
अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
पुलाचे काम आठ दिवसांत पूर्ण होऊ शकते. समस्या व अडचण दूर करण्यासाठी मार्ग व उपाय निघू शकतो. सर्वांनी सहकार्याथी भूमिका घेणे गरजेचे आहे.