प्रदूषणाच्या फेऱ्यातून पंचगंगा मुक्ती अशक्यच...कोट्यावधीचा खर्च तरीही मैलीच का..? प्रदूषण मुक्तीचा नारा निवडणुकीपुरताच राहिला
दरवर्षी मरणारे मासे, आणि प्रदूषणाचं चक्रव्युह भेदण्यास यंत्रणा असमर्थ
संतोष पाटील : कोल्हापूर
पंचगंगेच्या प्रवाहात मासे मृत झाले, नदीत मैलामिश्रीत पाणी मिसळले. रसायनयुक्त पाणी मिसळून नदीचे पाणी पिण्यास अयोग्य झाले. हे दरवर्षीचं दुखणं यंदाच्या वर्षीही कायम आहे. आतापर्यंत पंचगंगा प्रदुषण मुक्तीवर किमान 500 कोटी रुपयांचे खर्च झाला आहे. तरीही प्रदूषणाचा चक्रव्युह भेदण्यास राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा असमर्थ असल्याचे भीषण वास्तव सोमवारी सकाळी करवीर तालुक्यातील वळीवडे येथे मृत माशाचा पडलेला खच दर्शवत आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा नारा आता निवडणुकीच पुरताच उरला की काय? प्रदूषणाबाबत ना कोल्हापूकर अस्वस्थ होतात ना राजकारण्यांचा चाड आहे. ना यंत्रणा हवालदिल होते.
अतिवृष्टी आणि लांबलेल्या पावसाने पंचगंगा नदी तुलनेत अधिक काळ प्रवाहित ठेवली तरच पाणी नितळ आणि स्वच्छ राहते. नदीकाठावरील गावातून दुषीत पाण्याचा प्रवाह कायम असतो. गळीत हंगाम संपत आला की कुठेतरी रसायनयुक्त पाणी नदीत मिसळतेच. कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातून शेकडो नाले आणि गटारीतून दुषीत मैलायुक्त पाणी नदीत मिसळतेच. प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या दोन महापालिकांसह सर्व घटकांना आतापर्यंत दीड हजारांहून नोटीसा, दहाहून अधिक डिस्टीलरी आणि साखर कारखान्यांवर फौजदारी दावे, 150 उद्योगांना बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने देऊन त्यांचे काम केले आहे. तरीही उन्हाळ्याच्या सुरूवातीला नदी प्रदूषणात वाढ होते, तशी पुन्हा यंदाही होत आहे.
शहरातून नदीत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी 387 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. प्रदूषणाची व्याप्ती आणि होणाऱ्या उपाययोजना पाहिल्या तर मागील प्रमाणेच ही योजना कासवछाप आणि बिनकामाची खोटा शिक्का ठरणार, यात शंका नाही. धरणाच्या विसर्गापासून कृष्णेला पंचगंगा मिसळेपर्यंत प्रत्येक घटकाचा सुक्ष्म अभ्यास करुन शास्त्राrय पध्दतीने प्रदूषणकारी घटकांचा प्रतिबंध केल्याशिवाय पंचगंगा निर्मळ होणार नाही, हे वास्तव स्विकारुनच प्रदूषण मुक्तीचा आराखडा टप्प्याटप्प्याने का असेना, आखण्याची गरज आहे आणि ती सुरूवात करण्याची वेळ आता आली आहे.
कोट्यावधींची तरतूद आणि उपाययोजना करुनही पंचगंगेचे पात्र प्रवाहित ठेवणे हाच पारंपरिक उपाय आजही प्रदूषण मुक्तीसाठी प्रभावी मार्ग आहे. जलजन्य आजारांचा धोका वाढला असताना कागदावरची पंचगंगा संवर्धन उपाययोजना प्रत्यक्षात कधी उतरणार, हा खरा प्रश्न आहे. कोल्हापूर महापालिका दरवर्षी किमान पाच कोटी रूपये पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या अनुषंगाने खर्च करते. इचलकरंजी महापालिकेनेही कोट्यावधीचा निधी खर्च करत असल्याचा आहवाल सांगतो. कसबा बावडा येथे 75 कोटी रुपये खर्चून 76 दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले. पावसाळा संपल्यानंतरही मोठ्या प्रमाणात दुषीत पाणी नदीत जात असल्याने या केंद्रातील त्रुटी पुढे आल्या. आता पुन्हा तीन नव्या एसटीपी केंद्राची 387 कोटींतून उभारणी होईल. या निधी खर्चातून होणाऱ्या कामाचे दृश्य परिणाम पुढे यावेत. शहरातून नदीत जाणारे पाणी रोखले जाईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावा. न्यायालयीन बडगा चुकवण्यासाठी ही नव्याने केलेली चालूगिरी ठरु नये.
जिल्हापरिषदेने नदी प्रदूषणास कारणीभूत ठरण्राया 39 गावातील अभ्यास करुन या गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 40 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्याचा बारा वर्षापासून संकल्प केला आहे. नदी प्रदूषणास कारणीभूत ठरण्राया जिह्यातील 18 साखर कारखाने आणि 11 डिस्टलरीज्नी कोट्यावधी खर्चाचे प्राथमिक व दुय्यम दर्जाची जल शुध्दीकरण यंत्रणा कार्यन्वित केली आहे. जल प्रदूषण रोखणारी यंत्रणा बसवणे सोपे आहे. मात्र ती नित्यनियमाने चालवणे ही मोठी खर्चिक बाब आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईनिमित्त ही यंत्रणा कार्यान्वित केली जाते. त्यामुळे प्रदूषण करणारे घटक अहवालात पास होतात तर प्रत्यक्ष कृतीत उतरत नसल्यानेच नदी प्रदूषणात भर पडत असल्याचे वास्तव आहे. कोट्यावधीचा खर्च करुनही पावसाळा संपून एक-दोन महिन्यातच नदीत मेलेल्या माशांचा खच नदी काठावर पडतो, हे न उलगडलेले कोडे आहे. कागदोपत्री नदी प्रदूषण रोखण्यासाठी केलेली यंत्रणा व खर्च पाहता जिल्हा याकामी अव्वल ठरतो. प्रत्यक्षात परिस्थिती विपरीत असल्याची वस्तूस्थिती वळीवडे येथील मासे मृत प्रकरणाने पुन्हा ऐरणीवर आली.
या कारणांचे काय करणार ?
रोज नदीतून उपशा 120 दशलक्ष लिटर तर सांडपाणी 90 दशलक्ष लिटर 30 वर्षे जुनी भुयारी गटर योजना शहराच्या 55 टक्के भागात भुयारी गटरच (ड्रेनेज लाईन) नाही. 45 टक्के भागातील मैलामिश्रीत पाणी थेट गटारीत
शहरातील 50 हून अधिक लहानमोठ्या थेट पंचगंगेत पाणी पावसाळ्यात आणि संपल्यावर लगेच रोज नाल्यांतून प्लॅस्टिक सदृष्ट सरासरी 10 टन कचरा नदीत रासायनिक पाण्याचा नदीत विसर्ग
नदी खोऱ्यातील प्रदूषण
174 ग्रामपंचायती
8 लाख 34 हजार लोकसंख्या
रोज पिण्यासाठी 40 दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा
30 दशलक्ष लिटर सांडपाण्याची निर्मिती
3 लाख 65 हजार 876 हेक्टर पिकाखालील क्षेत्र
2 लाख 60 हजार टन रासायनिक खतांचा वापर
50 हजार लिटर दरवर्षी द्रवरुप खतांचा वापर.
500 टन स्मशान भूमीतील रक्षा थेट नदीत.
रोज किमान 25 हजार जनावरे नदीत धुतली जातात.
दरवर्षी 60 हजार टन निर्माल्य नदीत
225 ठिकाणी धुणी धुण्याची ठिकाणे.
50 हजारांहून अधिक लोकांची रोज आंघोळ.
125 ठिकाणी वाहने धुण्याची सोय.