पर्यटकांना खुणावतेय ‘सवतकडा’ धबधब्याची रांग; निसर्गाने एकाच ठिकाणी दिली सहा धबधब्यांची रांग
सुरक्षित वर्षा पर्यटनासाठी भुदरगडातील खात्रीशीर ठिकाण; पर्यटन विकास, वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने विकास; सात कोटींचा आराखडा, तीन कोटींची विकासकामे पूर्ण
धीरज बरगे कोल्हापूर
घनदाट जंगलातून धबधब्याकडे जाणारी चिखलमय वाट, वाटेतील मनमोहक सागवानाचे जंगल असा एक किलोमीटरचा थ्रील अनुभवल्यानंतर दर्शन घडते ते डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या सवतकडा धबधब्याचे. घनदाट जंगलातून वाहणारा हा धबधबा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र याच धबधब्याजवळ एकाच वाटेवर आणखी पाच धबधबे आहेत. त्यामुळे निसर्गाने पर्यटकांसाठी दिलेली ही जणू धबधब्यांची रांगच आहे. येथे सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्याने नितवडे, दोनवडे, खेडगे गावातील धबधब्यांची रांग सुरक्षित वर्षा पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे.
भुदरगड तालुक्यातील गारगोटीपासून पुढे सुमारे पंधरा किलोमीटरवर कडगांव-पाटगांव रोडवर नितवडे गाव आहे. येथील नितवडे, दोनवडे आणि खेडगे गावाच्या हद्दीत सवतकडा धबधबा आहे. घनदाट जंगलातील हा धबधबा वर्षा पर्यटनस्थळ म्हणून पुढे येत आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून आमदार प्रकाश आबिटकर आणि वन विभागांच्या संयुक्त विद्यमाने हे स्थळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले आहे. यासाठी सुमारे सात कोटींचा आराखडा तयार केला असून यापैकी तीन कोटींची कामे पूर्ण केली आहेत.
सोशल मीडियातून नितवडे येथील सवतकडा धबधब्याची ओळख झाली. निसर्गरम्य वातावरण अन् घनदाट जंगलातील या धबधब्याकडे आता पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. पण सवतकडा धबधब्याच्या अलीकडेच शंभर, दोनशे मीटरवर एका रांगेत महाकाय, भीमकाय, डुक्करकडा, जांभूळकडा, मंडीपकडा असे सहा धबधबे आहेत. त्यामुळे येथे सहा धबधब्यांची रांगच पर्यटकांसाठी आहे.
सुरक्षित पर्यटनाचे खात्रीशीर ठिकाण
घनदाट जंगलातील या पर्यटनस्थळांचा विकास करताना वन विभागाने पर्यटकांच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली आहे. पर्यटकांना चालण्यासाठी चिऱ्यांच्या पायऱ्या केल्या आहेत. पायवाटेला सुरक्षा ग्रील केले आहेत. धबधब्याचे पाणी प्रवाहित होऊन तयार झालेल्या ओढ्यांचे पात्र पार करण्यासाठी ओढ्यांवर आकर्षक पूल उभारले आहेत. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक बसवले आहेत. धोकादायक ठिकाणी प्रवेशास मनाई असल्याचेही फलक उभारले आहेत. एकंदरीत येथील विकासकामे पाहिल्यास सुरक्षित पर्यटनासाठीचे हे खात्रीशीर ठिकाण आहे.
पर्यटनवाढीला चालना
कोल्हापूर जिल्हा जैवविविधतेने नटलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी प्रसिद्धीपासून दूर आहेत. सोशल मीडियातून अज्ञातवासात असणारी अशी अनेक पर्यटन स्थळे प्रसिद्ध होत आहेत. शहरात नुकत्याच झालेल्या शाश्वत विकास परिषदेमध्येही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी पर्यटन क्षेत्राला चालना देण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते.
त्यानुसार सवतकडा धबधबा स्थळी केलेल्या विकासकामांमुळे येथील पर्यटनाला पुढील काळात मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.
अप्रतिम पर्यटनस्थळ बनवणार
नितवडे, खेडगे, दोनवडे परिसरात असणारे हे धबधबे अतिशय दुर्गम होते. या धबधब्यांपर्यंत जाताही येत नव्हते. पर्यटन विकास महामंडळाकडून निधी मंजूर करुन घेत हे ठिकाण विकसित करत आहे. सध्या 25 टक्के काम पूर्ण झाले असून सवतकडा परिसर अप्रतिम पर्यटनस्थळ बनवणार आहे. भविष्यात येथे नक्कीच पर्यटकांची गर्दी वाढून पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल.
- आमदार प्रकाश आबिटकर.