हद्दवाढ रेटल्यास न्यायालयात जाणार! सतेज पाटलांनी भूमिका जाहीर करावी- हद्दवाढ विरोधी कृती समितीचे आवाहन
कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीमध्ये समावेश असलेल्या १८ गावांच्या ग्रामपंचायती विकासासाठी सक्षम आहेत. त्यामुळे या गावांचा हद्दवाढीला सध्यातरी विरोधच असणार आहे. महापालिकेने सर्वप्रथम शहरातील मुलभूत समस्या सोडवाव्यात मगच हद्दवाढीबाबत पाऊले उचलावित. कोल्हापूर शहराची सद्यस्थिती पाहता ग्रामीण भागातील जनतेची हद्दवाढीमध्ये येण्याची मानसिकता नाही. त्यामुळे हद्दवाढीबाबत मार्ग काढण्यासाठी हद्दवाढ कृती समितीने चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन हद्दवाढ विरोधी कृती समितीचे तानाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेतून केले.
पाटील म्हणाले, खड्ड्यात हरवलेले रस्ते, अनियमीत पाणीपुरवठा अशा अनेक मुलभूत समस्यांनी शहरवासीय त्रस्त आहेत. शहरातील नागरिकांना महापालिका मुलभूत सुविधा पुरवू शकत नसल्याने महापालिकेने आधी शहरातील मुलभूत समस्या सोडवाव्यात मगच हद्दवाढीवर बोलावे. हद्दवाढ कृती समितीनेही केवळ आंदोलन न करता हद्दवाढ म्हणजेच शहराचा विकास या समजातुन बाहेर येवून चर्चेसाठी पुढे यावे, हद्दवाढीबाबत चर्चेतून मार्ग काढावा असे आवाहन केले.
पु. शिरोलीचे माजी उपसरपंच कृष्णा करपे म्हणाले, ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न असला तरी जलजीवन मिशनच्या माध्यमातून सर्वच ग्रामपंचायतींचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे. केंद्र व राज्य सरकारकडुन मिळणाऱ्या भरीव निधीमधून या गावांमध्ये भरघोस अशी विकासकामे झाली आहेत. त्यामुळे महापालिकेने सर्वप्रथम अशा पद्धतीने शहराचा विकास करुन दाखवावा की शहरालगतची गावे स्वतःहून हद्दवाढीमध्ये येण्यास तयार होतील, असे मत करपे यांनी व्यक्त केले.
पत्रकार परिषदेला पु.शिरोलीच्या सरपंच पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश, कोळी, माजी जि.प.सदस्य इरफान मणेर, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, सरनोबतवाडीचे उपसरपंच प्रमोद कांबळे, पाचगावचे भिकाजी गाडगीळ, कळंब्याचे प्रकाश पाटील-टोपकर, गांधीनगरचे गजेंद्र हेडगे, पूनम परमानंदानी, वळीवडेचे अनिल पंढरे, उचगांवचे तलाह मणेर, अनिल शिंदे, राजेंद्र संकपाळ, मोरेवाडीचे दिलीप शेटे, प्रमोद हुदले आदी उपस्थित होते.
हद्दवाढ रेटल्यास न्यायालयात जाणार
हद्दवाढीमध्ये समावेश असणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुका वर्षभरापुर्वीच झाल्या आहेत. एखाद्या ग्रामपंचायतीची निवडणुक झाली असेल तर अडीच वर्ष पूर्ण झाल्याशिवाय संबधीत ग्रामपंचायत बरखास्त करता येत नाही, असा कायदा आहे. त्यामुळे हद्दवाढ कृती समितेने केवळ राजकारण न करता अशा नियमांचाही अभ्यास करावा. हद्दवाढीमध्ये समावेश असणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुका होवून अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. त्यामुळे हद्दवाढ रेटल्यास प्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचे तानाजी पाटील यांनी सांगितले.
आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील भुमिका जाहीर करा
- हद्दवाढीमध्ये समावेश असणाऱ्या बहुतांश गावांच्या ग्रामपंचायतींवर आमदार सतेज पाटील गटाची सत्ता आहे. त्यांची सत्ता असणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच सदस्य यांचाही हद्दवाढीला विरोध आहे. तर आमदार पाटील गटाचे शहरातील लोकप्रतिनिधी हद्दवाढीला समर्थन करत आहे. यावरुन आमदार पाटील यांच्या गटातच हद्दवाढीवरुन दुटप्पी भुमिका असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी हद्दवाढीबाबत त्यांची भुमिका जाहीर करावी, असे आवाहन तानाजी पाटील यांनी केले.