महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चंदगडचे नेते जपतात मानवी संवेदना...!

03:51 PM Jul 17, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

विजयकुमार दळवी चंदगड

राजकारणातही माणुसकी जपणारी माणसं वावरत असतात. कधी ते स्वत:ची प्रसिध्दी स्वत: करतात वा कधी या हाताच त्या हाताला कळणार नाही, याची दक्षता घेऊन राजकारण करता करता मानवी संवेदना जपतात... त्यांत आमचे चंदगडकर कुठेच मागे नाहीत... हे येथील नेत्यांनी जपलेल्या मानवी संवेदनांतून स्पष्ट होते.

Advertisement

आमदार राजेश पाटील तसे अत्यंत बिझी व्यक्तिमत्व. दिवसभर पायात भिंगरी बांधून फिरतात. सकाळी सात ते रात्री अकरा-बारापर्यंत कामात असतात. मतदार संघातील सार्वजनिक आणि वैयक्तिक कामांबरोबरच मुंबईतील कामांवरही त्यांना लक्ष ठेवून रहावे लागते. सातत्याने फोनही अॅटेंड करावे लागतात. रात्रीसुध्दा फोन बंद किंवा सायलेंट करून विश्रांती घेण्याचा त्यांचा स्वभाव नाही.

Advertisement

असेच एकदा ते रात्री एकच्या सुमारास झोपले होते. मध्यरात्री दीड-दोनच्या सुमारास त्यांना अनोळखी फोन आला. पलिकडून आवाज आला, राजेशऽ... अरे टॅक्टर बंद पडलंय... लवकर डिझेल घेऊन ये... न्हायतर नंबराचा खुळांबा करशील...’राजेश पाटलांनी लगेचच काळजी करू नको... डिझेल पाठवतो, असे त्यास सांगितले आणि लागलीच तालुका संघाच्या पंपावर ड्युटीवरील कर्मचाऱ्याला रात्री दोन-सव्वादोन वाजता त्यांनी डिझेल घेऊन ट्रॅक्टर थांबलेल्या ठिकाणी पाठवले. खरं तर ट्रॅक्टर मालकाला नात्यातील राजेशला फोन करायचा होता. पण नावातील साधर्म्यामुळे त्या राजेश ऐवजी आमदार राजेशला त्या शेतकऱ्याने फोन लावला होता आणि घरच्या राजेशसारखीच आमदार राजेश पाटलांनी कामगिरी करून रात्रीच्यावेळी मोलाची मदत केली होती. या घटनेचा त्यांनी कुठेही गाजावाजा केला नव्हता. प्रसिध्दीपासून चार हात लांब वावरत त्यांचं हे कार्य असं सुरू आहे.

भाजपचे चंदगड तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील वरकरणी कठोर वाटत असले तरी ते सुध्दा हळवे मन जपून आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात तत्पर आहेत. ‘घार फिरे आकाशी... तिचे लक्ष पिल्लांपाशी...’ असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळेच चंदगड ते मुंबईचा त्यांचा सततचा प्रवास सुरू आहे. नुकताच त्यांनी नोकरी मेळावा घेतला. मुलाखतीसाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून जवळ-जवळ चार हजार तरूण, तरूणी आल्या. त्यांच्या सकाळच्या न्याहारीपासून दुपारच्या भोजनाची सोय त्यांनी मोफत केली होती. चहाचा रतीब सुरूच होता. मुलाखतीपासून नोकरीची ऑर्डर मिळेपर्यंत काहींना रात्रीचे दहा वाजले. रात्री थांबलेल्या या उमेदवारांना रात्रीच्या जेवणाबरोबरच प्रत्येक जण घरी सुरक्षित पोहचेल, यासाठी पंधरा-वीस गाड्या त्यांनी पदरमोड करून सोडल्या. प्रत्येकाची सोय व्हावी म्हणून ते रात्री उशिरापर्यंत स्वत: जागत राहिले, अशी काळजी घेणारा माणूस बघून अनेकांना समाधान वाटले.

राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभुळकर तर रणरागिणीच. अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रतिमा आहे. त्याही जमिनीवरच्या कार्यकर्त्या आहेत. प्रवास करताना त्यांना अपघातग्रस्त माणसं भेटली. त्यांनी जखमींना वेळेत रूग्णालयात पोहोचवण्यासाठी स्वत:ची गाडी देऊन डॉक्टरांनाही अवगत केले. घटनेचे गांभीर्य पटवून दिले. चंदगड तालुक्यातील धनगरवाड्यांवर वीज-पाणी, रस्ता देण्यात पुढाकार घेतला. बिदरमाळ, बांद्राईवाडी, कामतवाडा, कानूर आदी धनगरवाड्यांवर वीज देतानाच वीज येण्याच्या दिवशी धनगरांना टीव्ही पाहता यावा म्हणून टीव्ही पाठवला. गोरगरिबांना मदत करताना सर्वसामान्यांसारखे हळवे मन जपत वावरणाऱ्या नंदाताईना अनुभवताना समाधान वाटते.

दौलतचे शेती अधिकारी ते दौलतचे चेअरमन असा प्रवास करणारे गोपाळराव पाटील वरकरणी रागीट, फटकळ आणि तोंडावर टोमणे मारणारे वाटत असले तरी त्यांनी कार्यकर्त्यांच्या हृदयात हक्काचे स्थान मिळवले आहे. कार्यकर्त्यांशी त्यांचा अत्यंत आपुलकीचा व्यवहार असतो. त्यांच्या कार्यकर्त्यांना गोपाळराव नेते वाटतच नाहीत, तर त्यांना ते आपल्यासारखेच सर्वसामान्य वाटतात, हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्या. आपल्याकडे आहे, ते दुसऱ्यांना देण्याचा त्यांचा स्वभाव. पूर्वी मुलीच्या लग्नाची लग्नपत्रिका घेऊन येणाऱ्या बापाच्या हातावर ते पाच-दहा हजार रूपये ठेवायचे. पदरमोड करून मदतीचा हात द्यायचे. राजकारणातील या स्वभावामुळे त्यांनी गारूड घातले आहे. म्हणूनच कारखान्यातील अडचण दूर करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी लाखोंची त्यांना मदत केली होती. राजकारणात नेते कार्यकर्त्यांना पैसे देतात, पण इथे कार्यकर्तेच नेत्याला मदत करतात, हे वेगळे चित्र पाहायला मिळते.

गरिबांचा नेता म्हणून माजी मंत्री भरमू पाटील यांची प्रतिमा आहे. तालुक्यातील सर्वांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा भरमूअण्णांचा स्वभाव. वयाची आठ दशके उलटूनही त्यांचा उत्साह तरूणाला लाजवेल, असाच आहे. एकदा भरमू पाटील आपल्या जीडीएफ जीपतून जात होते. कडाडत्या उन्हात एक शेतकरी रेडकाला घेऊन निघाला होता. शेतकरी उन्हानं घामेघूम झाला होता. त्याच्यासमोर भरमूअण्णांनी गाडी थांबवली. अण्णांनी त्याला गाडीत बसण्यास सांगितले. त्यावर तो म्हणाला, ‘अण्णाऽ... या रेडकाचं काय करू?’ अण्णा म्हणाले, ‘रेडकास उचल आणि घाल गाडीत...’ शेतकऱ्याने रेडकाला गाडीत घातले आणि तो शेतकरी भरमूअण्णांच्या गाडीत बसला. मन मोठं असलं की कुठल्याही गाडीत जागा होते. गाडीच्या काचा वर करून कार्यकर्त्यांना टाळणाऱ्यांना भरमू पाटलांनी अंजन घालतानाच एक नेता गरिबांसाठी कसे काम करू शकतो, हे कृतीतून दाखवून दिले. म्हणूनच त्यांचे गरीब कार्यकर्ते पेंद्यामामा आणि गोंद्यामामा विमानातून फिरते झाले होते. चंदगडच्या राजकारणात वावरणारे नेते खरोखरच संवेदनशिल हदय जपत बेरजेचे राजकारण करत वाटचाल करत आहेत.

Advertisement
Tags :
Chandgarhhuman sensibilitieskolhapur news
Next Article