Kolhapur News: मद्यपींकडून आराम बसवर हल्ला, दगडफेक करत काचा फोडल्या
यानंतर आणखी सात ते आठ तरुणांनी घटनास्थळी येत चाकू हल्ला केला
कळंबा : आजरा गारगोटीमार्गे पुण्याला निघालेल्या आराम बसवर कळंबा रोड वरील भन्नाटवाडी हॉटेलच्या दारात तीन मद्यपी तरुणांनी दगडफेक करत काचा फोडल्या. यानंतर आणखी सात ते आठ तरुणांनी घटनास्थळी येत चाकू हल्ला केला. यामध्ये चालकाच्या हातावर चाकू लागल्याने चालक जखमी झाला.
चालक, वाहकासह आणखी एकजण जखमी झाला आहे. तरुणांकडून सुरू असलेल्या दगडफेकीनंतरआराम बसमधील पॅसेंजर घाबरले. त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. प्रकाराची माहिती कळताच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा चार ते पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आजरा गारगोटीमार्गे पुण्याला निघालेली स्वामी समर्थ ट्रॅव्हल्स रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कात्यायनीपासून पुढे आली. यावेळी आराम बसच्या पुढे दुचाकीवरून तीन युवक निघाले होते. दुचाकीस्वार आराम बसच्या आडव्या आल्याने चालकाने मागून हॉर्न दिला.
यावर त्यामध्ये आराम बसच्या आडवी दुचाकी थांबवत हॉर्न का वाजवलास म्हणून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्या तीन तरुणांनी आराम बसवर दगडफेक करत काचा फोडल्या. यानंतर फोन करून आणखी सात ते आठ युवकांना बोलावून घेतले. दरम्यान चालकाला खिडकीतून खाली ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने दरवाजा लॉक केला असल्याने मद्यपींना दरवाजा उघडता आला नाही.
त्यांनी चाकूने खिडकीतून चालकावर हल्ला केला. यामध्ये चालकाच्या हातावर चाकू लागल्याने चालक अनिकेत भोई (रा. गुडाळ, ता. राधानगरी) जखमी झाला. तसेच वाहक आझाद बिगुलजी, रा. तुरंबे ता. राधानगरी आणि आणखी एक पॅसेंजर जखमी झाला. घटनास्थळी पोलीस दाखल घडल्या प्रकाराची माहिती चालकाने तत्काळ पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर कळवली.
करवीर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. लगेचच हल्लेखोर तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. नशेखोरांचा वारंवार त्रास कळंबा तलाव परिसरात रोज रात्री या नशेखोर तरुणांचा वावर असतो. रात्री तलावाच्या पुढील बाजूस असलेल्या अंधाराचा फायदा घेत येथे मध्य प्राशन व गांजाचे सेवन करत हे नशेखोर तरुण थांबलेले असतात, रात्रीच्या वेळेस या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांवर अशा पद्धतीने हल्ला केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत, त्यामुळे या भागात रात्रीच्या वेळेस पोलीस ग्रस्त वाढवण्याची मागणी कळंबा ग्रामस्थांमधून होत आहे.
दरवाजा लॉक केल्याने अनर्थ टळला मद्यधुंद तरुण पूर्णपणे नशेत होते त्यांना आपण काय करतोय हे काही समजत नव्हते. त्यांनी बसवर अंदाधुंदपणे दगडफेक केली. यामध्ये आराम बसची पुढची व ड्रायव्हरच्या बाजूची काच फुटली. तसेच चालकावर चाकूने हल्ला चढवला व आराम बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पण वाहकाने तत्काळ दरवाजा आतून लॉक केला.
त्यामुळे या मद्यधुंद तरुणांना आराम बसमध्ये शिरता आले नाही. वाहकाने प्रसंगावधान दाखवत दरवाजा आतून लॉक केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.