Navratri 2025: घरोघरी आदीशक्तीचा जागर अन् अंबामातेचा गजर, नवरात्रीची चैतन्यमय सुरुवात
शहरासह जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे
कोल्हापूर : नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीचा उत्सव. याच आदिशक्तीचा जागर सोमवारपासून सुरू झाला. त्यानिमित्त घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. करवीर नगरातील देवींची मंदिरे रोषणाईने उजळून गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामदैवतांची मंदिरेही विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेत. शहरासह जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात नवरात्रीनिमित्त मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंडळांनी देखील दुर्गामातेच्या प्रतिष्ठापनेबरोबरच दांडियाची जय्यत तयारी केली आहे. सोमवारी रात्रीपासून शहरासह ग्रामीण भागात दांडियाची धूम असणार आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह जिह्यातील सर्व मंदिरे व घरोघरी सोमवारी घटस्थापना करून शारदीय नवरात्रौत्सवाच्या चैतन्यदायी सोहळ्यास प्रारंभ झाला.
आश्विन शुद्ध तृतीया तिथीत वृद्धी झाल्याने उत्सव दहा दिवस साजरा केला जाणार आहे. या काळात अंबाबाईची पूजा दशमहाविद्या स्वरूपात बांधण्यात येणार आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला सोमवारी पहाटे 6.30 वाजता देवीची नित्य पूजाभिषेक झाला, त्यानंतर 7.30 वाजता देवीचे पारंपरिक श्रीपूजक मुनिश्वर कुटुंबीयांकडून अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात मंगल वाद्यांच्या गजरात घटस्थापनेचा विधी झाला.
घटस्थापनेनंतर जाधव घराण्याकडून सकाळी 9 वाजता तोफेची सलामी देण्यात आली. त्यानंतर अंबाबाईची महापूजा पार पडली. त्यानंतर अंबाबाईची उत्सवमूर्ती सनई-चौघड्याच्या गजरात घटाच्या शेजारी विराजमान करण्यात आली. आणि नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. मंत्रोच्चारांमध्ये घटस्थापनेची महापूजा झाल्यानंतर मंदिरातील इतर धार्मिक कार्यक्रम सुरू झाले.
नवरात्रकाळात अंबामातेला रोज तीनवेळा अभिषेक आणि पाचवेळा आरती करण्यात येते. या उत्सव काळात अंबाबाईची रोज विविध रूपांत जडावी सालंकृत पूजा बांधण्यात येणार आहे. रोज रात्री अंबाबाईचा पालखी सोहळा शाही लवाजम्यासह होतो. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेला देवीची श्री कमलादेवी रूपातील पूजा बांधण्यात आली होती.
मंगळवारी श्री बगलामुखी, बुधवारी तारा, गुरुवारी मातंगी, शुक्रवारी भुवनेश्वरी, शनिवारी अंबारीतील पूजा, रविवारी षोडशी त्रिपुरसुंदरी, सोमवारी महाकाली, मंगळवारी महिषासुरमर्दिनी, बुधवारी भैरवी आणि गुरुवारी रथारूढ रूपातील पूजा बांधण्यात येणार आहे. नवरात्रौत्सव काळात अंबाबाई आणि त्र्यंबोलीदेवी भेटीचा सोहळा व कोहळा फोडण्याचा विधी ललिता पंचमी दिवशी केला जाणार आहे.
अष्टमीला देवीच्या पालखीची नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. नवमीला खंडेपूजन व विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी रथारूढ रूपातील पूजा बांधण्यात येणार आहे. शहरात अंबाबाई मंदिरासह भवानी मंदिर, जोतीबा मंदिर, त्र्यंबोली मंदिर, नवदुर्गा मंदिरासह कात्यायनी मंदिरात नवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे सोमवार पासून आयोजन करण्यात आले आहे.
अंबाबाई मंदिरांमध्ये आर्कषक फळा, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरात भाविकांसाठी दर्शन मंडपाची व्यवस्था केली आहे. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात भवानी मातेची विविध रूपात सालंकृत पुजा तसेच रोज आरती, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
वाडी रत्नागिरी येथील श्री जोतीबा मंदिरात नवरात्रीची सुरूवात रविवारी सनई, तुतारीच्या गजरात झाली आहे. जोतीबा देवाचा जागर 29 रोजी होणार आहे. त्यादिवशी रात्रभर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. कळंबा येथील कात्यायनी मंदिरात रोज आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
मंडळांनी देखील मंडपात तर उपनगरांतील चौकांत तसेच लॉ न्समध्ये दांडिया-गरबा, रंगीबेरंगी रोषणाई अशा दिमाखदार आयोजनामुळे तरुणाई दांडियाच्या तालावर थिरकण्यास सज्ज झाली आहे. धार्मिकता, पावित्र्य तसेच दांडिया-गरबामुळे शहर आणि परिसरासह जिल्हा उत्साहात न्हाऊन निघणार आहे.
झेंडूचा भाव वाढला नवरात्रोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. फुलबाजारात झेंडू फुलांचे दर दुप्पट झाले आहेत. बाजारात देशी पिवळा गोंडा (झेंडू) आणि केशरी (गोंडा) यांना मागणी वाढली आहे. यामध्ये 100 ते 120 रुपये किलो दराने विक्री केला जात होता. कमळाचे फूल 40-50 रुपये प्रतिनग विक्री केले जात होते. नवरात्रीत रोज फुलांची माळ देवीला वाहिली जाते, घटा शेजारी बांधली जाते, त्यामुळे या फुलांना मागणी वाढली आहे.