Navratri 2025 Kolhapur Navdurga: संसार चक्रातून मुक्त करणारी देवता, मुक्तांबिका!
या नवदुर्गा देवीचा उल्लेख करवीर महात्म्यामध्ये आढळतो
By : दिव्या कांबळे
कोल्हापूर : करवीर नवदुर्गा परिक्रमेतील दुसरी नवदुर्गा म्हणजेच मुक्तांबिका. या देवीच्या दोन्ही बाजूंना हत्ती असल्यामुळे तिला गजेंद्रलक्ष्मी असे संबोधले जाते. मुक्तांबिका देवीचे पूजक वैभव माने यांनी ‘तरुण भारत संवाद’च्या नवदुर्गा विशेष पर्वात देवीचे महात्म्य सांगितले.
या नवदुर्गा देवीचा उल्लेख करवीर महात्म्यामध्ये आढळतो. शाहू छत्रपती स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच पूर्वीच साठमारीचे जे मुख्य प्रवेशद्वार होते, त्या प्रवेशद्वाराजवळ या देवीचे स्थान असल्याचा उल्लेख आढळतो. गजेंद्रलक्ष्मी देवीच्या आख्यायिकेची माहिती पुजारी वैभव माने यांनी दिली.
ते म्हणाले, संसार चक्रातून मुक्त करणारी देवता म्हणून या देवतेला मोक्कांबिका म्हटले जाते. तिचे मूळ ठाणे कर्नाटकातील कोल्हूर येथे आहे. तेथे असलेल्या शिलालेखात ही देवता मूळची कोल्हापूरची असल्याचा उल्लेख आहे. कोल्हूर याला दुसरे कोल्हापूर म्हटले जाते. कोल्हापूर आणि मोक्कांबिका यांचे असे जवळचे नाते आहे.
कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरा बरोबरच करवीर नवदुर्गांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्यांच्या दर्शनाने अधिक पुण्यफलप्राप्ती होते, अशी महती आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीला अभिषेक घातला जातो. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी छत्रपतींच्या अंबा देव घरातील तुळजा भवानीच्या पादुका देवीच्या भेटीसाठी येतात.
त्यावेळी छत्रपतींचे चोपदार, मानकरी, छत्रपती परिवाराकडून पानाचा विडा, साडी चोळी अर्पण केली जाते. स्वामी विवेकानंदांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिराचा इतिहास जागता रहावा म्हणून दादा गजबळ स्वामी यांनी येथे 1921 मध्ये विवेकानंद आश्रमाची स्थापना केली.
मुक्तांबिका देवीच्या मंदिरात शिवलिंग आहे. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे, की शिवलिंगासमोर नंदी नाही. हे शिवलिंग चौथऱ्यावर बसवलेले आहे. देवीच्या दोन्ही बाजूला हत्ती आहेत. शाहू महाराजांनी राजचिन्हाचे प्रतीक म्हणून हत्तींच्या सोंडेमध्ये चवऱ्या दिल्या आहेत.
दीड फूट काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. एका हातामध्ये त्रिशूल आणि दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे. देवीचे दोन हात गुडघ्यावर ठेवलेले आहेत. त्या दोन्ही हातांमध्ये बिल्वफळ जमिनीच्या दिशेने झुकलेले आहे. बिल्वफळ समृद्धी आणि परिपक्वतेचे प्रतीक मानले जाते. शिव, शक्ती आणि लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे या मूर्तीची ठेवण कामाख्या देवीसारखी आहे.
चैत्रामध्ये अंबाबाईचा रथोत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी छत्रपतींचा रथोत्सव असतो. त्यानंतर शाहू महाराजांनी स्वत: अंबाबाई रथोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गजेंद्र लक्ष्मी देवीचा रथोत्सव साजरा केला. त्याचे वैशिष्ट्या असे, की शाहू महाराजांनी या देवीकरिता स्वतंत्र असा रथ तयार केला होता.
तो रथ हत्ती ओढत. रथ रावरेश्वर मंदिराच्या पिछाडीस गाडीखाना परिसरामध्ये ठेवला जात होता. संस्थान असेपर्यंत हा रथउत्सव साजरा होत होता. कालांतराने हा रथोत्सव 1985 पासून बंद झाला. पण नंतर नवदुर्गेच्या निमित्ताने त्याचे पुनरुज्जीवन झाले. 2023 पासून रथोत्सवाला सुरुवात झाल्याचे माने यांनी सांगितले.