For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Navratri 2025 Kolhapur Navdurga: कमलासनावर आरुढ असलेली दुर्गा, कमलजा, काय सांगते अख्यायिका?

01:47 PM Sep 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
navratri 2025 kolhapur navdurga  कमलासनावर आरुढ असलेली दुर्गा  कमलजा  काय सांगते अख्यायिका
Advertisement

करवीर महात्म्य उल्लेख असलेले हे मंदिर नृसिंह मंदिर म्हणून ओळखले जाते

Advertisement

By : दिव्या कांबळे

कोल्हापूर : नवदुर्गा परिक्रमेतील पाचवी नवदुर्गा म्हणजे कमलजा देवी. साक्षात कमलासनावर आरूढ असलेल्या या दुर्गेची पितरांच्या मुक्तीसाठी प्रार्थना केली जाते. या देवीची महती नयन राऊत यांनी नवदुर्गा विशेष पर्वात सांगितली. शिवाजी पेठ, उभा मारुती चौकानजीक कमलजादेवीचे मंदिर आहे. करवीर महात्म्य उल्लेख असलेले हे मंदिर नृसिंह मंदिर म्हणून ओळखले जाते.

Advertisement

गेल्या तीन पिढ्यांपासून उभा मारुती चौकानजीकचे राऊत कुटुंब कमलजादेवीची पूजा करताहेत. या मंदिराच्या अगदीच जवळ वरुणतीर्थ आहे. सध्या हे वरुणतीर्थ बुजवून तेथे गांधी मैदान तयार केले आहे. भीमाशंकर क्षेत्रावर महादेवांनी दुर्गासुरांशी युद्ध केले. कमलजादेवी ही सिंहावर आरूढ होऊन युद्धाला आली. युद्धात तिने दुर्गासुराचा वध केला.

यावर प्रसन्न होऊन साक्षात ब्रह्मदेवांनी कमलजादेवीची कमलपुष्पांनी महापूजा केली. तेव्हापासून ही देवता ‘कमलजा“ या नावाने ओळखली जाऊ लागली, असे महिला पुजारी नयन राऊत यांनी सांगितले. देवीबाबत त्या म्हणाल्या, देवी कमळात विराजमान आहे म्हणून तिला कमलजा हे नाव देण्यात आले आहे. चर्तुभूज असलेल्या ‘कमलजाला‘ कमलांबा या नावाने ही ओळखले जाते.

या मंदिरात कमळात बसलेली देवीची मूर्ती आहे. कमलजा हे दुर्गेचे अभय प्रदान करणारे स्वरूप मानले जाते. अर्धा शिवाजी पुतळा येथून रंकाळा तलावाच्या दिशेने जाताना या देवीचे मंदिर आहे. हे मंदीर नृसिंह मंदिर म्हणून ओळखले जाते. कमलासनावर आरूढ असलेली ही मूर्ती चतुर्भुज आहे. देवीची पूजा सुरुवातीला सुखदेव राऊत हे करत होते. आता ही पूजा नयन राऊत आणि त्यांचे पती करतात.

देवीची मूर्ती दोन हात उंचीची काळ्या पाषाणाची आहे. या मंदिरात श्रीनृसिंह, विठ्ठल-रुक्मिणी, महादेव या देवता आहेत. पितरांच्या मुक्तीसाठी देवीची प्रार्थना केली जाते. पूर्वी येथे असलेल्या तळ्याला विरजतीर्थ (लोणारतळे) म्हणत असत. आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक संपन्नता देणार हे मंदिर म्हणून याची ख्याती आहे.

नृसिंह मंदिराचे विशेष म्हणजे, या मंदिरामध्ये दोन ते अडीच फुटाच्या दरवाजातून खाली वाकून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. हे मंदिर कमलजा मंदिराच्या सोबतच बांधले गेले होते. या मंदिरात नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात भक्त मंडळी विशेष करून महिला वर्गाची झुंबड उठते. भक्तिभावाने दर्शन घेण्यासाठी लांबून लोक येत असतात, असे नयन राऊत यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.