कोल्हापूर- नंदवाळ दिंडीत घडणार चांदीच्या रथाचे दर्शन!
ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळाचा संकल्प : 60 किलो चांदीने आळंदीच्या धर्तीवर होणार रथाची निर्मिती : राजेश क्षीरसागर यांचे सर्वतोपरी सहकार्याचे अभिवचन
संग्राम काटकर कोल्हापूर
कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ या पायी दिंडीसाठी आळंदीच्या धर्तीवर चांदीचा रथ बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याच्यादृष्टीने ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ ट्रस्टने पाऊल टाकले आहे. 60 किलो चांदीमध्ये मंडळाने आळंदीच्या धर्तीवर रथ तयार करण्याचे नियोजन केले आहे. सागवानी लाकडापासून मोठा रथ बनवून त्याला नक्षीदार चांदीचे भाग जोडले जाणार आहे. रथासाठी लागणारी सर्व चांदी देण्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अभिवचनही दिले आहे. लवकरात लवकर रथ बनवून तो पुढील वर्षाच्या आषाढी एकादशीनिमित्त आयोजित कोल्हापूर ते नंदवाळ या दिंडीत आणला जाणार आहे. या रथामुळे दिंडीला आळंदीसारखेच वैभवच प्राप्त होणार आहे.
पंढरपूरकडे प्रस्थान करताना विठ्ठलाने नंदवाळमध्ये (ता. करवीर) विश्रांती घेतली होती. त्यामुळे नंदवाळला विठ्ठलाचे निजस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. निजस्थानाची आठवण म्हणून नंदवाळमध्ये बांधलेल्य विठ्ठलाचे मंदिराची करवीर महात्म्यात नोंदही सापडते. ही माहिती जशी उजेडात आली तशी भाविकांची पाऊले नंदवाळकडे वळू लागली. अशाच 19 वर्षापूर्वी कोल्हापुरातील ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पोवार यांनी वारकरी व विठ्ठल भक्तांना सोबत घेऊन आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ या पायी दिंडीची परंपरा सुऊ केली. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिराजवळून निघणाऱ्या दिंडीमुळे नंदवाळच्या महत्वात अधिकची भर पडली. दिंडीतील श्रद्धा म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची मूर्ती विराजमान केलेला रथ. पॉप्युलर स्टील वर्क्सने लोखंड व प्लायवुडपासून बनवलेला रथ दिंडीसाठी दिला. रथात ठेवल्या जाणाऱ्या या लोखंडी पालखीत ज्ञानेश्वरांच्या मूर्तीसह पादुका व ज्ञानेश्वरी ठेवून प्रत्येक वर्षीच्या आषाढी एकादशीला दिंडी नंदवाळकडे रवाना होत राहिली. दिंडीतून करवीरनगरीसह जिह्यातील भजनी मंडळे, हजारो वारकरी, टाळकरी व भाविक हरिनामाचा गजर करत नंदवाळकडे जाऊ लागले.
दिंडीला 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दिंडीसाठी चांदीची पालखी बनवण्याचा विचार पुढे आला. तो सत्यात आणण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळ ट्रस्टने चांदी दान करण्याचे भाविकांना आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत भाविकांनी 21 किलो चांदी ट्रस्टकडे जमा केली. पंचगंगा तालीमजवळील कारागिराकडून 21 किलो चांदीमध्ये पालखी बनवून घेतली. हीच पालखी आषाढी एकादशीनिमित्त आयोजित कोल्हापूर ते नंदवाळ दिंडीत दाखल कऊन त्यात ज्ञानेश्वरांची मूर्ती विराजमान केली जाऊ लागली. गतवर्षीच्या दिंडीवेळी ज्ञानेश्वर माऊली मंडळ ट्रस्ट व राजेश क्षीरसागर यांनी दिंडीसाठी चांदीचा रथ बनवण्याचा संकल्प सोडला होता. तो सत्यात आणण्यासाठी नुकतीच विठ्ठल मंदिरात बैठक बोलवली. यात क्षीरसागर यांच्या हस्ते चांदीच्या रथाच्या कामाचा प्रारंभ केला. रथाची निर्मितीसाठी 120 घनफूट सागवान लाकूड व सर्व चांदी देण्याचे क्षीरसागर यांनी अभिवचनही दिले आहे. त्यामुळे जशी चांदी व लाकूड मिळत जाईल, तशी कारागिरांकडून रथ बनण्याच्या कामाला वेग घेतला जाणार आहे.
रथासाठी दिलेल्या ट्रॉलीचे क्षीरसागर यांच्या हस्ते पुजन...
पुढील वर्षीच्या दिंडीतील नव्याने बनवला जाणारा चांदाची रथ ठेवण्यासाठी पॉप्युलर स्टील वर्क्सचे राजेंद्र जाधव यांनी ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळाला ट्रॉली भेट दिली आहे. या ट्रॉलीचे क्षीरसागर यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी दिंडी प्रमुख आनंदराव लाड महाराज, चोपदार भगवान तिवले, माजी महापौर सागर चव्हाण, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुजित भाऊ चव्हाण, बाळासाहेब पोवार, दीपक गौड, गुरव महाराज व अक्षय पोवार उपस्थित होते.