For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Municipal Election 2025: महापालिका निवडणूकीत अपक्षांचा बाजार उठणार, कारण..

11:39 AM Jun 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
municipal election 2025  महापालिका निवडणूकीत अपक्षांचा बाजार उठणार  कारण
Advertisement

पाचशे हजार मतांच्या जोरावर आविर्भावात वावरणाऱ्यांची मोठी गोची होणार?

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकांसह जिल्हा परिषदेचे प्रभागवार आरक्षण लवकरच काढले जाईल. यंदाची महापालिकांची निवडणूक ही चार प्रभागाचा एक मिळून होणार आहे. त्यामुळे गल्ली पॅक केली आहे, मंडळाचा पाठींबा आहे, भागात आपलाच दरारा आहे, अशा पाचशे हजार मतांच्या जोरावर आविर्भावात वावरणाऱ्यांची मोठी गोची होणार आहे.

किमान 20 हजार मतदारांना सामोरे जावे लागणार असल्याने अपक्षांना ही निवडणूक घाम फोडणारी ठरणार आहे. चार प्रभागामुळे महापालिकेत पक्षीय राजकारणाचा बोलबाला होईल. जिल्हा परिषदेत एकदा निवडणूक झाल्यानंतर फुटाफुटीचे प्रसंग खूपच कमी घडतात. मात्र महापालिकेत एका रात्रीत इकडून तिकडे जाऊन सत्तेचा लंबक फिरवलेल्या घटनांची संख्या मोठी आहे.

Advertisement

यातून घोडेबाजार हा शब्दही सर्वमान्य झाला. अपक्ष निवडून आलेल्या अनेकांनी सभागृहात आपला बहुमोल पाठींबा देण्यासाठी कधी पद तर पैशात आपले मोल केले. 2005 पर्यंत महापालिका निवडणुकीत अपक्षांची बाजी होती. प्रभागात वरचढ असणाऱ्या पहिल्या तिघांवर कोणीतरी पैसा लावायचे. निवडून येईल तो आपलाच, हा फंडा होता.

मात्र 2005 च्या निवडणुकीत जनसुराज्यशक्ती पक्षाने प्रथमच पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यानंतर 2010 निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ताकदीने मैदानात उतरला. येथून पुढे खऱ्या अर्थाने महापालिकेत पक्षीय राजकारण सुरू झाले. मात्र कोणाही एका पक्षाला बहूमत न मिळाल्याने अपक्षांची ताकद वाढलेली होती.

येणारी निवडणूक ही चार प्रभागांचा एक प्रभाग अशी होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रभागात सरासरी 5 हजार मतदार होते. यापुढे 20 हजार मतदार असतील. यापूर्वी एका प्रभागातील मतदार एकच मतदान करत होते, यावेळी त्यांना चार मते देण्याचा अधिकार असेल. वीस हजार मतांचा प्रभाग पिंजून काढणे, सर्व लोकांपर्यंत आपला अजेंडा घेऊन जाणे हे अपक्षांच्या ताकदीच्या बाहेरची गोष्ट आहे.

एखादा-दुसरा अपवाद वगळता यंदाच्या नव्या सभागृहात अपक्षांची कधी नव्हे इतकी संख्या रोडावलेली दिसेल. पक्षीय राजकारण मजबूत होणे हे स्थिर कारभारासाठी महत्वाचे आहे. पक्षाच्या अजेंड्यानुसारच काम करावे लागणार असल्याने आपसूकच नगरसेवकांवर एकप्रकारची मर्यादा राहणार आहे. याचा सकारात्मक परिणाम शहराच्या सर्वांगिण विकासावर होईल, अशी आशा करण्यास हरकत नाही.

मनपा निवडणुकीचा खर्च कोटीत

महापालिकेच्या सभागृहात नुकताच एक सेवानिवृत्तीचा सोहळा झाला. या सोहळ्यात एका ज्येष्ठाने आता तुम्ही सभागृहात या, असे आवतन देत महापौरसाठी दोन कोटी लागतील, अशी मिश्कील टिप्पणी केली. यावरुन सभागृहात येण्यासाठी खर्चाचा अंदाज येतो. तरुण मंडळांसह मतदारांचा कल सांभाळताना उमेदवारांच्या नाकेनऊ येणार आहे.

आता मतदारांच्याही त्याअर्थाने अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचे खूप कमी इच्छूक धाडस करतील. इतक्या मोठ्या प्रभागात प्रचार यंत्रणा एकट्याने राबवणेही त्रासदायक ठरणारे आहे. पक्षाची साथ मिळाल्यास मतदारांपर्यंत पोहोचण्यासह प्रचार यंत्रणा राबवणे सोपे होणार आहे.

त्यामुळे इच्छुकांची पक्ष हीच पहिली चॉईस असेल. पक्षाने संधी दिली तर उभं राहायचे, ही सावध भूमिका यातूनच पुढे येत आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल

Advertisement
Tags :

.