Kolhapur Breaking | कोल्हापूर महापालिकेत होणार 'ओबीसी' महापौर!
राज्यातील 29 महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर
कोल्हापूर : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी नुकतीच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून, यामुळे आगामी निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या सोडतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, अनेक ठिकाणी दिग्गजांना संधी मिळाली आहे, तर काही ठिकाणी प्रस्थापितांचा हिरमोड झाला आहे.
राज्याची राजधानी बृहन्मुंबई (BMC), सांस्कृतिक राजधानी पुणे, आणि उपराजधानी नागपूर या तिन्ही प्रमुख महापालिकांचे आरक्षण 'सर्वसाधारण' (Open) प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे. याव्यतिरिक्त नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नवी मुंबई आणि अमरावती या मोठ्या शहरांतही खुल्या प्रवर्गाचे आरक्षण असल्याने येथे चुरशीच्या लढती पाहायला मिळतील.
आरक्षित जागांचे समीकरण:
ठाणे महानगरपालिका 'अनुसूचित जाती' (SC) साठी राखीव झाल्याने तेथे चुरस वाढली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये 'अनुसूचित जमाती' (ST - पुरुष) प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. महिला आरक्षणाचा विचार करता, पिंपरी-चिंचवड आणि भिवंडी-निजामपूरमध्ये 'सर्वसाधारण महिला' राजकारणाची धुरा सांभाळतील. तर लातूर आणि जालना या शहरांत 'अनुसूचित जाती महिलां'साठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
ओबीसी आरक्षण:
ओबीसी प्रवर्गासाठीही महत्त्वपूर्ण आरक्षणे जाहीर झाली आहेत. अहिल्यानगर, अकोला, चंद्रपूर आणि जळगाव या ठिकाणी 'ओबीसी महिला' अशी सोडत निघाली आहे. तर कोल्हापूर, इचलकरंजी, पनवेल आणि उल्हासनगर येथे 'ओबीसी (महिला किंवा पुरुष)' असे आरक्षण असल्याने या शहरांत ओबीसी नेत्यांना मोठी संधी मिळणार आहे. या आरक्षण सोडतीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे
महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर
1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला)
2. नवी मुंबई: सर्वसाधारण
3. वसई- विरार: सर्वसाधारण
4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
5. कोल्हापूर: ओबीसी
6. नागपूर: सर्वसाधारण
7. बृहन्मुंबई: सर्वसाधारण
8. सोलापूर: सर्वसाधारण
9. अमरावती: सर्वसाधारण (महिला)
10. अकोला: ओबीसी (महिला)
11. नाशिक: सर्वसाधारण
12. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण
13. पुणे: सर्वसाधारण
14. उल्हासनगर: ओबीसी
15. ठाणे: अनुसूचित जाती
16. चंद्रपूर: ओबीसी (महिला)
17. परभणी: सर्वसाधारण
18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )
19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण
20. मालेगाव: सर्वसाधारण
21. पनवेल: ओबीसी
22. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण
23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण
24. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
25. जळगाव: ओबीसी (महिला)
26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
27. धुळे: सर्वसाधारण (महिला)
28. जालना: अनसूचित जाती (महिला)
29. इचलकरंजी: ओबीसी