महाविकास आघाडीला नाकारलं आणि महायुतीला स्वीकारलं...पंधरा वर्षे महायुतीचे सरकार टिकणार
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवरून येत्या पंधरा वर्षे महायुतीचे सरकार टिकून राहणार असा दावा राज्यसभेचे खासदार धनंजय महाडीक यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच लोकसभेच्या सर्व जागा आणि विधानसभेच्या एक दोन सोडल्या तर सर्व जागा महायुतीच जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधताना खासदार महाडीक म्हणाले, "महाराष्ट्रात जिथे जिथे ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आहेत त्या ठिकाणी नागरिकांनी महायुतीला कौल दिला आहे. या निवडणूकीमध्ये 75 ते 80 % ग्रामपंचायती महायुतीकडे आल्या आहेत. त्यामुळे पुढील पंधरा वर्षे महायुतीचे सरकार राहणार याची चुणूक या ग्रामपंचायत निकालामधून दिसून येत आहे." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, "या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नागरिकांनी महाविकास आघाडीला नाकारलं आणि महायुतीला स्वीकारलं हे दिसून आलं आहे. त्यामुळे लोकसभेच्या सर्व जागा आणि विधानसभेच्या एक दोन जागा सोडल्या तर सर्व ठिकाणी महायुती जिंकेल. राज्यात नंबर एकचा पक्ष हा भाजप आहे. ज्या ग्रामपंचायती विजय झाल्या यातील सर्वाधिक सदस्य आणि सरपंच हे भाजपचेच आहेत." असा दावाही त्यांनी केला.
शेवटी बोलताना भाजपच्या खासदारांनी "देवेंद्र फडणवीस यांचे निर्णय हे लोकांना पसंतीस येत आहेत यामुळे जनता भाजपाला कौल देत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर दक्षिणमधून काय निर्णय येईल हे चिंचवाडच्या निकालावरून दिसत आहे. चिंचवाडच्या नागरिकांनी एकतर्फी निकाल लावला आहे. चिंचवाडमध्ये आमच्या विचारांचे लोक निवडून आलेले आहेत. विधानसभेत तिथे भाजपचाच उमेदवार निवडून येईल." असेही त्यांनी म्हटले आहे.