कोल्हापूरच्या आमदारांना मंत्रीपदाचे वेध
हसन मुश्रीफ यांचे नाव निश्चित
विनय कोरे, प्रकाश अबिटकर यांचे पारडे जड
नेत्यांकडे फिल्डींग : नेत्यांची डोकेदुखी वाढली
राजेश क्षीरसागर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक यांच्यात रस्सीखेच
इच्छुकांची संख्या जास्त, पदे कमी
कोल्हापूर: विनोद सावंत
जिल्ह्यातील महायुतीचे सर्वच दहा उमेदवार विजयी झाले आहेत. यामधील बहुतांशी आमदारांना मंत्रीपदाचा वेध लागले आहेत. राष्ट्रवादीतून हसन मुश्रीफ यांचे मंत्रीपद निश्चित मानले जात आहे. जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे, शिवसेनेचे प्रकाश अबिटकर यांचेही पारडे जड मानले जात आहे. याचबरोबर शिवसेनेतून राजेश क्षीरसागर, चंद्रदिप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर, भाजपमधून अमल महाडिक यांच्यातही मंत्रीपदासाठी रस्सीखेच दिसून येत आहे. मंत्रीपदाची संख्या कमी आणि इच्छुक जास्त अशी स्थिती झाली असून यामध्ये मंत्री पदाचे लॉटरी कोणाला लागणार याकडे आता लक्ष लागून आहे.
विधानसभेची निवडणूक झाली असून 288 पैकी 230 हून अधिक जागा जिंकल्याने महायुतीची राज्यात एकहाती सत्ता आली आहे. कोल्हापूरमध्ये यंदा प्रथमच महायुतीने सर्व 10 जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला आहे. गत निवडणूकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी कोल्हापूर जिल्हा भाजप मुक्त केल्याचा दावा केला. गत निवडणूकीत काँग्रेसचे चार आमदार होते. परंतू यंदाच्या निवडणूकीत कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस मुक्त झाला आहे.
महायुतीच्या विजयी आमदारांना आता वेध मंत्रीपदाचे लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी विशेष विमानाने कोल्हापुरातील आमदार मुंबईला गेले होते. परंतू सत्तास्थापनाचा मुहुर्त लांबणीवर पडला आहे. असे असले तरी मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी लॉबिंग सुरू केले आहे.
यामध्ये कोल्हापुरात राष्ट्रवादीतून एकमवे आमदार असणारे हसन मुश्रीफ यांचे मंत्रीपद निश्चित मानले जात आहे. भाजपच्या कोट्यातून विनय कोरे तर शिवसेनेतून प्रकाश अबिटकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. कोरे हे ज्येष्ठ नेते असून गेल्या पाच वर्षामध्ये त्यांना मंत्रीपद मिळालेले नाही. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नकटवर्तीय असून पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळामध्ये त्यांना संधी मिळेल, असे बोलले जात आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राधानगरीत प्रचारावेळी प्रकाश अबिटकर यांना मंत्रीपद देण्याचा शब्दही दिला आहे. अबिटकर यांनी विजयाची हटट्रीक केली आहे. एकनाथ शिंदे यांची ओळख दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून सर्वश्रृत आहे. त्यामुळे कोरे, अबिटकर यांचेही मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये पारडे जड मानले जात आहे. आमदार अमल महाडिक यांची दुसरी टर्म असून त्यांच्याकडूनही मंत्रीपदासाठी फिल्डींग लावली जात आहे.
जिल्ह्यातील दहा आमदारांपैकी अशोक माने, शिवाजी पाटील यांची पहिली टर्म असल्याने त्यांना यावेळी मंत्रीपद मिळणे अशक्य आहे. एकूणच पदाची संख्या, पक्षाचे विजयी उमेदवारंची संख्या आणि मागणी पाहता कोल्हापुरात मंत्री पद देताना नेत्यांची डोकेदुखी होणार यात शंका नाही.
राजेश क्षीरसागरही रेसमध्ये
राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. ते तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. सध्या त्यांच्याकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद आहे. आगामी काळात कोल्हापूर महापालिकेची निवडणूक आहे. आमदार सतेज पाटील यांना शह देण्यासाठी शिवसेना येथे बळकट होणे आवश्यक आहे. यासाठी क्षीरसागर यांनाही मंत्रीपद मिळण्याची चर्चा वर्तवली जात आहे.
राहूल आवडेंसाठी कार्यकर्ते आग्रही
माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठींबा दिला होता. अडीच वर्ष महायुती सत्तेत होती. यावेळी त्यांना कोणतेही पद मिळाले नाही. तसेच भाजपच्या नेत्यांचे आदेशाचे पालन करत लोकसभेची उमेदवारी माघारी घेत धैयशील माने यांच्या पाठीशी राहिले. या सर्वाचा विचार करून राहूल आवाडेंना मंत्री पद मिळावे, अशी भावना त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त होत आहे. कल्लाप्पा आण्णा आवडे, प्रकाश आवडे पहिल्या टर्ममध्येच मंत्री झाले असून हीच परंपरा राहूल आवडे करणार का हे पाहणे औत्सक्याचे आहे.
पालकमंत्रीपदी कोणाची लागणार वर्णी
सध्या कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफ यांना संधी मिळेल, असे बोलले जात आहे. परंतु जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. राष्ट्रवादीचे एक तर भाजपचे दोन आमदार आहेत. संख्याबळाचा विचार केल्यास शिवसेनाही या पदावर दावा करू शकते. यामध्ये आबिटकर किंवा राजेश क्षीरसागर यांचा समावेश असेल. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास त्यांचे निकटवर्तीय असणारे जनसुराज्यचे विनय कोरेंनाही संधी मिळू शकते.