डीजेसह लेसर बीमवर बंदी घालण्याची कोल्हापूर मेडिकल असोसिएशनची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
डॉल्बीमुळे होणारा आवाज आणि लेसर बीममुळे आरोग्यावर घातक परिणाम होतो. यामुळे शासनाने या दोन्हीवर बंदी घालावी अशी मागणी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने केली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, मेडिकल असोसिएशनच्या निदर्शनास आले की, डॉल्बीमुळे निर्माण होणाऱ्या अत्याधिक ध्वनीलहरीमुळे गंभीर ध्वनीप्रदूषण होते. तर लेसर बीमचा वापर डोळयांसाठी गंभीर धोका म्हणून ओळखला जातो. सणाच्या मिरवणूकीत या शक्तीशाली लेसर किरणांच्या थेट संपर्कामुळे व्यक्तींना विशेषत: लहान मुले आणि वृध्दांना तात्पुरते ते कायमचे अंपगत्व येत असल्याचे वृत्त आहे.
सणासुदीच्या काळात आणि नंतर आवाज प्रेरित श्रवणशक्ती कमी होणे, तणाव आणि डोळयांना गंभीर दुखापत होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. परिस्थिती गंभीर टोकाला पोहोचली आहे. यामुळे लोकांच्या आरोग्याच्या हितासाठी डॉल्बी आणि लेसर बीमवर बंदी घालावी. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अमोल कोडोलीकर,सेक्रेटरी डॉ.शीतल देसाई,डॉ.अरुण धुमाळे उपस्थित होते.