For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापुरात ‘महा’विजयोत्सव...‘महाविकास’चे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपतींच्या विजयानंतर आनंदोत्सव

09:51 PM Jun 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
कोल्हापुरात ‘महा’विजयोत्सव   ‘महाविकास’चे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपतींच्या विजयानंतर आनंदोत्सव
Shahu Chhatrapati
Advertisement

नवीन राजवाडा, आजिंक्यतारा कार्यालयावर कार्यकर्त्यांची गर्दी; गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात जल्लोष

कोल्हापूर प्रतिनिधी

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या विजयानंतर कोल्हापुरात महाविजयोत्सव साजरा करण्यात आला. नवीन राजवाडा येथे श्रीमंत शाहू छत्रपती यांनी कुटुंबिय अन् समर्थकांसह गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. तर या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनी आजिंक्यतारा कार्यालय येथे गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी अन् साऊंड सिस्टमच्या दणदणाटात एकच जल्लोष केला.

Advertisement

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महाविकासचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती आणि महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यात चुरशीने लढत झाली. गेली महिनाभर दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात आला. नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने वातावरणही तापले होते. प्रचार अत्यंत चुरशीने झाल्याने कोल्हापूरच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते.
एक महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. टपाली मतमोजणीपासूनच श्रीमंत शाहू छत्रपती यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. यानंतर प्रत्येक फेरीत शाहू महाराजांची आघाडी कायम राहिली. नवीन राजवाडा येथे श्रीमंत शाहू छत्रपती कुटुंबिय आणि कार्यकत्यांसह मतदानाची माहिती घेत होते. सातव्या फेरीतील आघाडीनंतर नवीन राजवाडा येथे छत्रपती परिवाराने कार्यकर्त्यांसह गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. तर या निवडणुकीची धुरा सांभाळलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनीही श्रीमंत शाहू छत्रपती निर्णायक मताधिक्य घेतल्यानंतर आजिंक्यतारा कार्यालय येथे एकत्र आले. येथे त्यांनी गुलालाची उधळण केली. तसेच फटाक्यांची आतषबाजी करत साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात एकच जल्लोष केला.

कोल्हापुरच्या राजकारणातील चाणक्य...
श्रीमंत शाहू छत्रपती यांनी निर्णयाक आघाडी घेतल्यानंतर आजिंक्यतारा कार्यालय येथे श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या अभिनंदनाचा फलक उभारण्यात आला. तर या फलकाच्या लगतच आमदार सतेज पाटील यांचा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा चाणक्य आशा आशयाचा उभारलेला फलक लक्षवेधी ठरला.

Advertisement

सकाळच्या सत्रात शहरात शुकशुकाट
सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाली. सकाळपासुन शहरासह जिल्ह्यातील नागरिक मतमोजणीचे अपडेटस् मोबाईल, टिव्हीच्या माध्यमातून घेत होते. त्यामुळे दिवसभर सकाळच्या सत्रात नेहमीच वाहतुक व नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेल्या शहरातील प्रमुख मार्गांवर शुकशुकाट होता.

Advertisement
Tags :

.