शाहू महाराजांच्या रूपाने बहुजनांचा आवाज लोकसभेत पाठविणार! जिल्ह्यातील ७६ समाज संघटनांनी दिला शाहू महाराजांना पाठिंबा
जिल्ह्यातील ७६ समाज संघटनांनी दिला शाहू महाराजांना पाठिंबा, विजयाचा केला निर्धार
प्रत्येक समाजाला घडवण्यासाठी राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्या घराण्याने मोठे योगदान दिले आहे. या ऋणातून उतराई होण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच आम्ही त्यांचा प्रचार सुरू केला आहे. महाराज हे बहुजन समाजाचे आवाज आहेत, हा आवाज लोकसभेत पोहोचविण्यासाठी त्यांना विजयी करणारच असा निर्धार कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील ७६ समाजाच्या वतीने करण्यात आला. सर्व समाजाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी शाहू महाराजांनाच प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी प्रचारात उतरावे असे आवाहन केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व समाजाच्या वतीने संयुक्त मेळावा जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील होते. यावेळी सर्व समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराजांना पाठिंबा दिला.
या मेळाव्यात स्वागत करतानाच आ. सतेज पाटील यांनी 16 एप्रिल रोजी छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज सकाळी अकरा वाजता भरावयाचा आहे त्यासाठी सर्व महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते याबरोबर सर्व समाजाच्या लोकांनी दसरा चौक येथे जमावे असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे उप नेते आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार,संपर्कप्रमुख विजय देवणे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मराठा महासंघांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, लिंगायत समाजाच्या नेत्या सरलाताई पाटील, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष आर के पोवार, रिपाई गवई गटाचे दगडू भास्कर, माजी नगरसेविका उमा बनछोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मालोजीराजे छत्रपती म्हणाले की एवढ्या मोठ्या संख्येने सर्व समाज, संस्था, संघटना एकत्र येण्याचा असा प्रयोग फक्त कोल्हापुरातच यशस्वी होऊ शकतो. ही आता फार मोठी ताकद निर्माण झाली आहे. प्रत्येक समाजाने आपल्या या ताकतीचा उपयोग करावा. आणि गावागावात खेड्या खेड्यात असलेल्या आपल्या प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचावे त्यातील तरुण वर्गाला सक्रिय करावे. अठरापगड जाती एकत्र आलेल्या पाहून राजर्षी शाहू महाराजांना ही निश्चित आनंद झाला असेल. अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले की, सामाजिक समतेची नदी कोल्हापुरातून एक संधपणे वाहत आहे. त्याला रोखण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला. पण यावेळी श्रीमंत शाहू महाराजांनी स्वतः रस्त्यावर उतरून समाजाला जागे करण्याचे काम केले. कोल्हापुरात चुकीचे काही घडत असेल त्याला आवर घालण्याचे पद्धत श्रीमंत शाहू महाराज यांनी नेहमी अवलंबली आहे. आपल्या विरोधकांना निकाल कळला आहे. म्हणून ते आता शिंतोडे उडवण्याचे काम करीत आहेत. त्यांना जागा दाखवण्याचे काम आपण केले पाहिजे.
मल्हार सेनेचे बबनराव रानगे म्हणाले, शाहू महाराजांनी प्रत्येक समाजाला काही ना काही मदत केली आहे. त्याची उतराई म्हणून त्यांना निवडून देणे ही प्रत्येक समाजाची गरज आहे. राजर्षी शाहू महाराजांचे आणि धनगर समाजाचे वेगळे नाते आहे. धनगरवाड्यावर जाऊन धनगरांच्या घरी कांदा भाकरी खाणारे राजर्षी शाहू महाराज होते आणि त्यांचाच वारसा सध्याचे श्रीमंत शाहू छत्रपती ही चालवत आहेत. माझ्या राजाला मतदान करायला पाहिजे ही प्रत्येक समाजाची भावना आहे.
कॉम्रेड बाबुराव तारळी म्हणाले, लिंगायत समाजासाठी शाहू महाराजांनी शिक्षणासाठी बोर्डिंगसह अनेक सुविधांची उपलब्ध करून दिल्या आहेत. म्हणूनच आता शाहू महाराजांच्या पाठीशी संपूर्ण लिंगायत समाज १०० टक्के राहणार आहे.
वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे यांनी विरोधी उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर टीकास्त्र सोडताना मागच्या वेळी माणूस चुकला, त्यांना निवडून दिले पण कामासाठी मात्र आम्ही त्यांच्याकडे हेलपाटे मारून दमलो. त्यामुळे आता यावेळी मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. आता श्रीमंत शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आम्ही शंभर टक्के मतदान करणार असून त्यांचा जिल्हाभर फिरून प्रचार करणार आहे.
प्रजासत्ताक संघटनेचे दिलीप देसाई म्हणाले, जात-पात न मानता शाहू महाराजांसाठी संपूर्ण समाज आज एकवटला आहे. बाबा इंदुलकर म्हणाले की लढाई सोपी नाही तसेच अवघडही नाही. फक्त जागे राहण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी 'अंधेरेंमे एक प्रकाश, श्रीमंत शाहू महाराज, शाहू महाराज' अशी घोषणाही दिली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आर. के. पोवार म्हणाले, आपापल्या समाजाचे मतदान मोठ्या संख्येने व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी 'शिवसेनेचं ठरलयं गद्दारांना मतदान नाही' असे घोषवाक्य ही जाहीर केले.
जोशी गोंधळी वासुदेव समाजाचे बबन कावळे, सुतार लोहार समाजाचे अध्यक्ष डी. बी.लोहार व बेलदार समाजाचे संजय मोहिते ,महादेव कोळी समाजाचे यशवंत पाटील, कांजारभाट समाजाचे प्रकाश गोमाणे, ख्रिश्चन समाजाचे दीनानाथ कदम, जिजामाता संघटनेच्या सुनीता पाटील, माळी समाजाचे उपाध्यक्ष अनिल माळी, अशोक राजाराम माळी यांच्यासह अनेकांनी महाराजांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी मुस्लिम समाजाचे गणी आजरेकर, तौफीक मुलाणी, मराठा सेवा संघांचे चंद्रकांत पाटील,चर्मकार समाजाचे रघुनाथ मोरे, युवराज मोरे, भोई समाजाचे प्रा. एकनाथ काटकर, डॉ. सुनील काटकर,बुरुड समाजाचे जयवंत सोनवले, विजय सूर्यवंशी,परीट समाजाचे वसंत वाठारकार, दिलीप लिंगम,वडर समाजाचे उमेश पवार,सुतार -लोहार समाज दिगंबर लोहार,फासे पारधी समाजाचे गणेश काळे, मोहन काळे,कोळी समाजाचे सतीश कोळी,ओ बी सी बहुजन पार्टी एकनाथ कुंभार,करवीर तालुका ग्रामोद्योग संघ रामजी रोटे,तांबट समाजाचे अध्यक्ष कुलदीप पेणकर,सनगर समाजाचे महादेव डमकले, हणबर समाजाचे शामराव खोत, रेणुका भक्त संघटना उदय पाटील, सारस्वत समाजाचे सचीन जनवाडकर, माकडवाला कोचीकोरवी समाजाचे व्यंकप्पा भोसले, प्रवीण पुजारी, कुंभार समाजाचे प्रकाश कुंभार काका निगवेकर,दिगंबर जैन बोर्डिंगचे सुरेश रोटे,नाभिक समाजाचे नारायण पोवार सिंधी समाज कुमार अहुजा,पप्पू अहुजा, पांचाळ समाज बाळू सुतार, द. म. वीरशैव समाजाचे अध्यक्ष राजू वाली, सुहास भेंडे, खाटीक समाजाचे सुजित प्रभावळे, विजय कांबळे,वीरशैव कक्कया ढोर समाज शिवाजी पोळ, प्रवीण सोनवणे कैकाडी समाज विलास मुळे, समस्त बौध्द समाजाचे भास्कर मालेकर उपस्थित होते.
त्यांना जनता सोडणार नाही.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले, कागल मध्ये महाविकास आघाडीला वातावरण अतिशय चांगले आहे. राजर्षी शाहू महाराज ज्या घराण्यात जन्मले तो तालुका पुरोगामी विचार सोडून तीन गद्दारांना कदापिही पाठिंबा देणार नाही. यावेळी त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शरसंधान करताना 'त्यांना इडी, सीबीआयने वाचवले पण जनता त्यांना सोडणार नाही' शाहू महाराज आणि आ. सतेज पाटील यांच्यावर टीका केली तर आम्हीही त्यांना सोडणार नाही. पळता भाई थोडी करून सोडू! कारण त्यांचे जे काही काळे धंदे आहेत ते सगळे मला माहिती आहेत. त्यांनी हे थांबवावे असा इशाराही दिला.
रिपाई गवई, आठवले गट शाहू महाराजांसोबतच
रिपाई कवाडे गटाचे दगडू भास्कर, बबन शिंदे म्हणाले, आमचे नेते म्हणून प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आज महायुतीच्या नेत्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसले आहेत. पण आम्ही ते मान्य केलेले नाही. आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीबरोबरच असून शाहू महाराजांसाठी आम्ही आणि आमचे सर्व कार्यकर्ते प्रचार करणार आहे.