Kolhapur Mahapalika Fraud: दुसऱ्या टप्प्यात ठेकेदार, कलेक्टर रडारवर, प्रशासकांचे कारवाईकडे लक्ष
खुलासा सादर केलेल्या 19 जणांचा चौकशी अहवाल आज सादर केला जाणार
कोल्हापूर : महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी बुधवारी केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर आता दुसऱ्या टप्प्यात अधिकाऱ्यांचे खास ठेकेदार आणि कलेक्टर त्यांच्या रडारवर असणार आहेत. यासंदर्भातील माहित घेण्याचे काम सुरु आहे. तसेच खुलासा सादर केलेल्या 19 जणांचा चौकशी अहवाल आज सादर केला जाणार आहे. त्यामुळे अहवालानंतर ड्रेनेजलाईन घोटाळा प्रकरणात आणखी कोणाची नावे येणार आणि पुढे प्रशासक काय कारवाई करणार याकडे लक्ष असणार आहे.
कसबा बावडा येथील ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण होण्याअगोदरच ठेकेदार श्रीप्रसाद वराळे याला बिल अदा केल्याप्रकरणी प्रशासक के. मंजूलक्ष्मी अॅक्शन मोडवर आल्या आहेत. बुधवारी त्यांनी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकौंटंट तथा सहा. अधिक्षक बळवंत सुर्यवंशी, वरिष्ठ लिपीक जयश्री हंकारे यांना निलंबित केले. तर मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ व वरिष्ठ लेखापरिक्षक सुनील चव्हाण यांची शासनामार्फत विभागीय चौकशी करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यास मान्यता दिली.
सेवानिवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सेवानिवृत्त उप-शहर अभियंता रमेश कांबळे व पवडी अकाऊंट सेवानिवृत्त कनिष्ठ लिपीक प्रभाकर नाईक यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशी समितीला अहवाल सादर करण्यास सात दिवसांची मुदत दिली होती. मात्र बुधवारी पुन्हा समितीला 48 तासात अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि शहर अभियंता रमेश मस्कर हे आज गुरुवारी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे अहवाल सादर करणार आहे. बुधवारी त्यांनी 19 अधिकारी, कर्मचारी यांनी सादर केलेल्या खुलाशांमधील टिप्पणी घेत त्यामधील वस्तुस्थिती अहवालामध्ये मांडली आहे. अहवाल आज सादर होणार असून पुढील कारवाईकडे लक्ष असणार आहे.
कागदपत्रांची जुळवाजुळवीत व्यस्त
चौकशीच्या फेऱ्यात आलेले अधिकारी कर्मचारी यांची चौकशीला सामोरे जाण्यासाठीची धावपळ सुरु झाली आहे. बुधवारी दिवसभर संबंधित अधिकारी विधिज्ञांचा सल्ला अन् कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त होते.
कारवाईचा धसका अन् धाकधूक
प्रशासकांनी मंगळवारी केलेल्या कारवाईचा धसका मनपा अधिकारी, कर्मचारी यांनी घेतला आहे. या कारवाईची चर्चा बुधवारी दिवसभर सुरु होती. याप्रकरणामध्ये सहभागी असणारे पण सध्या या सर्वच प्रकारापासून अलिप्त असणारे अशा काहीची नावे पुढील काळात निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकांच्या कारवाईचा धसका अधिकारी, कर्मचारी यांनी घेतला असून पुढील टप्प्यात या प्रकरणामध्ये आपले नाव येणार का, अशी धाकधूक काहींना लागून राहिली आहे.
त्यांच्या कामाची माहिती घेण्याचे काम सुरु
महापालिकेतील अधिकाऱ्यांचे काही खास ठेकेदार आहेत. अधिकाऱ्यांकडून त्यांनाच बहुतांश कामे दिली जात असल्याची चर्चा आहेत. तसेच कसबा बावडा ड्रेनेज लाईन प्रकरणामुळे अधिकाऱ्यांचे कलेक्टरही चर्चेत आले आहेत. त्यामुळे आता अधिकाऱ्यांचे खास ठेकेदार अन् कलेक्टर प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या रडारवर आले आहेत. असे ठेकेदार, कलेक्टर यांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
दुसऱ्या टप्प्यात आणखी काहींची नावे
ड्रेनेज घोटाळा प्रकरणी पहिल्या टप्प्यात 19 अधिकारी, कर्मचारी यांची नावे पुढे आली आहेत. त्यानंतर आता चौकशी अहवालामधून दुसऱ्या टप्प्यात या प्रकरणात सहभाग असणारे पण नाव समोर न आलेल्या अशा काही जणांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे खास कर्मचारी, कलेक्टर अशांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.