कोल्हापूर लोकसभेसाठी 'सरप्राईज चेहरा' समोर येऊ शकतो; सतेज पाटलांचा गौप्यस्फोट
कोल्हापूरच्या लोकसभेसाठी अनेक जण इच्छुक असले तरी ऐन वेळी सरप्राईज चेहरा समोर येऊ शकतो असा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे. तसेच शिंदे गटातील सात खासदार हे भाजपच्या तिकिटावर निवडणुक लढणार असून आमदार अपात्रतेच्या निकालानंतर त्याला वेग येणार आहे असाही दावा त्यांनी केला असून राजू शेट्टी आमच्या बरोबर येण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार असेही त्यांनी म्हटले आहे.
आज कोल्हापूरात त्यांनी राजाराम कारखान्याच्या कार्यस्थळावर माध्यमांशी संवाद साधला, कोल्हापूर लोकसभेच्या जागेसंदर्भात बोलताना त्यांनी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, "काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना लोकसभेच्या कोणत्या जागा आपल्याला हव्या आहेत याची लिस्ट पाठवलेली आहे. याबाबतचा निर्णय आगामी काही काळात होऊन त्यामध्ये स्पष्टता येईल. त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून येण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न असणार. तिन्ही पक्षांपैकी जागा कुणाला मिळणार यापेक्षा भाजप विरोधात लढणे हिच आमची भूमिका असणार आहे."असेही ते म्हणाले.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवार कोण यावर बोलताना त्यांनी नविन खुलासा केला. "कोल्हापूर मतदारसंघात अनेक जण इच्छुक आहेत. या ठिकाणी निवडूण येणारा उमेदवार आम्ही देणार आहोत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये 'सरप्राईज उमेदवार' येऊ शकतो. जागा कोणाच्याही वाटेला आली तरी तिन्ही पक्षात चर्चा होईल."असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीमध्ये येणार का प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, "राजू शेट्टी यांच्याशी दोन वेळा प्राथमिक चर्चा झाली आहे. तरीही शेवटपर्यंत त्यांना आमच्या सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू राहणार आहे." असे ते म्हणाले.
शिंदे गटातील खासदार भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा करताना त्यांनी शिवसेना शिंदे गटातील सात खासदारांनी भाजपच्या तिकिटावर लढण्याचे लेखी पत्र दिले असल्याचा धक्कादायक खुलासा केला. तसेच 10 जानेवारीला होणाऱ्या आमदार पात्रतेच्या निर्णयावर सर्व जागा वाटपाचे सूत्र असवलंबून असून त्यानंतर तात्काळ उमेदवारी देण्यात येणार आहे. असाही दावा त्यांनी केला.
शिवसेना ठाकरे गटाने सुरु केलेल्या संकल्प यात्रेवर टिका करता ते म्हणाले, "शिवसंकल्प यात्रेतून काय विकल्प मिळाला हे लोकांना अजूनही कळलेलं नाही त्यामुळे नवीन यात्रेतून जनतेला काय मिळणार आहे ?" असा टोलाही त्यांनी हाणला.