संजय मंडलिक, धैर्यशील माने, राजू शेट्टी यांचे उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन
कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी संजय सदाशिराराव मंडलिक यांनी सोमवारी आपले नामनिर्देशन दाखल केले. तर हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी धैर्यशील संभाजीराव माने आणि राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. मंडलिक आणि माने यांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केला आहे. तर शेटी यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे.
लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेटी यांनी सोमवारचा मुहुर्त साधत दुपारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मंडलिक आणि माने हे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. तर राजू शेटी यांनी अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान,तीनही उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मंडलिक आणि माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आले होते. तसेच महायुतीतील अन्य काही मंत्री, खासदार,आमदार, नेते, पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. दुपारी मंडलिक आणि माने हे मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. मंडलिक यांनी 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे 4 नामनिर्देशन पत्रे दाखल केली. मंडलिक यांच्या उमेदवारांवर अर्जावर पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या सूचक म्हणून सह्या आहेत. हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी धैर्यशील माने यांनी 4 नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे दाखल केली. त्यांच्या उमेदवारी अर्जावर संजय शिंदे, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर हे सूचक आहेत.
हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी आज राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी यांनी 2 नामनिर्देशनपत्रे दाखल केली. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून अनिल बाळू मादनाईक, रामचंद्र विरुपाक्ष फुलारे, विठृल बाबूराव मोरे, राजाराम गणपत देसाई यांच्या सह्या आहेत.