कोल्हापूर - कोकण प्रस्ताव बोर्डाच्या प्लॅनिंग ग्रुपकडे
कोल्हापूर :
कोल्हापूर ते कोकण या वैभववाडी रेल्वे मार्गाचे अंतिम सर्वेक्षण झाले आहे. या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाच्या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपकडे पाठविला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे प्रबंधक आर.के.मेहत्ता यांनी मीना यांचे स्वागत केले.मीना यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर रेल्वे प्रशासनाने स्थानकावर पूर्वतयारी केली होती.दरम्यान, मीना यांनी स्थानकातील विविध विभागांना धावती भेट देत माहिती घेतली. तसेच कामाबाबत सूचना केल्या.अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून पुनर्विकास करण्यात येणारे काम लवकर पूर्ण करण्यास सांगितले.
यावेळी कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाची सद्यस्थितीबाबत त्यांना विचारले असता मीना म्हणाले, “रेल्वे मार्गासंदर्भात जो प्रस्ताव येतो, त्याची छानन केली जाते. त्यानंतर त्याचे सर्वेक्षण होऊन तो प्रस्ताव नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपकडे पाठविला जातो. त्याप्रमाणे कोल्हापूर ते वैभववाडी मार्गाचा प्रस्ताव या ग्रुपकडे पाठविण्यात आला आहे.“ मुंबई रेल्वे स्थानकातील प्लॅटफार्म बारा व तेराचे काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापुरातून सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत सुरू होईल. हे काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.“
गांधीनगर व रुकडीतील रेल्वे थांबे बंद झाले आहेत. तेथे पुन्हा रेल्वे थांबावावी, अशी प्रवाशांची मागणी असल्याचे सांगितल्यानंतर मध्य रेल्वेचे मुख्य कमर्शियल व्यवस्थापक शामसुंदर गुप्ता यांनी कोल्हापूर ते मिरज मार्गावर हुपरी व जयसिंगपूर ही या मार्गावरील स्थानके आहेत. या मार्गावर अतिरिक्त लुप लाईन टाकली जाणार आहे, असे स्पष्ट केले.राणी चन्नमा एक्सप्रेस प्रवाशांच्या मागणीनुसारच सांगलीतून सोडण्यात येत असल्याचे सांगितले. या वेळी पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, रेल्वे प्रबंधक आर. के. मेहता उपस्थित होते.
- खासदार महाडिक,रेल्वे प्रवासी संघटनांच्या मागण्या
यावेळी खासदार धनंजय महाडिक तसेच रेल्वे प्रवासी संघटनांकडून धरमवीर मीना यांच्याकडे नवीन रेल्वे सुरु करण्यासंदर्भात निवेदन दिले. कोल्हापूर कलबुर्गी गाडी सुपरफास्ट असूनही गाडीचे डबे मात्र साधे आणि रंगीबेरंगी आहेत.सुपरफास्ट दर्जाचे डबे गाडीला जोडावेत.कोल्हापूर-मुंबई जन्मशताब्दी रेल्वे सकाळी पाच सुरु करावी,कोल्हापूर -हैदराबाद ही रेल्वे बंद झाली आहे.ती गाडी सोलापूर मार्गे सुरु करावी,सातारा-कोल्हापूर तात्काळ 12 डब्यांची डेमू रेल्वे सुरु करावी,कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पूर्वीप्रमाणे सुरु करावी, कोल्हापूर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु करावी अशा मागण्या प्रवासी संघटनेने मीना यांच्याकडे केल्या. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर-मुंबई मार्गावर वंदे भारत प्रमाणे आठवड्यातील सहा दिवस दुसरी गाडी सुरु करण्याची मागणी केली आहे.
- स्टेशनवर पंधरा मिनिटे मंदिरात अर्धा तास
रेल्वेचे कोणतेही अधिकारी आले की अंबाबाई मंदिरात जातात.स्टेशनच्या कामासाठी कमी वेळ आणि मंदिरातच त्यांचा अधिक वेळ जातो.मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनीही मंगळवारी आपल्या कोल्हापूर दौऱ्यात रेल्वे स्टेशनवर पंधरा मिनिटेच पाहणी केली.मंदिरात मात्र अर्धा तास घालवला.