केशवराव भोसले नाट्यगृहाचा मलबा हटवण्यासाठी निविदा! स्ट्रक्चरल ऑडीटच्या कामास येणार गती
18 सप्टेंबर पर्यंत मुदत
कोल्हापूर प्रतिनिधी
केशवराव भोसले नाट्यागृहाच्या जळालेल्या भागाचा मलबा हटविण्यासाठी महापालिकेच्या वतीने निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही निविदा भरण्यासाठी बुधवार (18 सप्टेंबर) पर्यंत मुदत असणार आहे. यानंतर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या स्ट्रक्चरल ऑडीटच्या पुढील कामास गती येणार आहे.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाला 8 ऑगस्ट रोजी भीषण आग लागली. यामध्ये नाट्यागृह जळून खाक झाले. नाट्यागृहाचा दर्शनी भाग आणि दगडी इमारतीचा काही भाग शिल्लक राहिला आहे. केशवराव भोसले नाट्यागृह आगीमध्ये भस्मसात झाल्यानंतर त्याच्या पुनउभारणीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. केशवराव भोसले नाट्यागृहाच्या स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाच्या स्ट्रक्चरल ऑडिट पुर्ण करण्यात नाट्यागृहाच्या जळालेल्या मलब्याचा अडथळा येत आहे. हा मलबा हटविल्यानंतरच उर्वरीत नाट्यागृहाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार असल्याचे पत्र संबंधीत कंपनीकडून महापालिकेस देण्यात आले होते. दरम्यान मागील आठवड्यामध्ये विमा कंपनीने मलबा हटविण्याबाबत पत्र दिले होते. यामुळे मलबा हटविण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. महापालिकेने शुक्रवारी मलबा हटविण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. बुधवार (18 सप्टेंबर) पर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे.
लाकूड, लोखंड करणार वेगळे
विमा कंपनीने महापालिकेस गुरुवारी पत्र दिले आहे. यामध्ये मलबा हटविण्यास हरकत नाही. मात्र यातील साहित्याचे विभाजन करण्यात यावे. लोखंड, लाकूड, दगड, पत्रा, खरमाती यांची विभागणी करुन ठेवण्यात यावे. या सर्वांचे व्हॅल्युएशन करण्यात येणार आहे. 5 लाखांच्यावर व्हॅल्युएशन झाल्यास याचा लिलाव होणार आहे.
स्ट्रक्चरल ऑडीटला येणार गती
केशवराव भोसले नाट्यागृहाच्या काही भागाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. मात्र उर्वरीत भागात जळालेल्या साहित्याचा मलबा असल्यामुळे ऑडीटचे काम थांबले होते. मात्र आता या कामालाही गती येणार आहे.