For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भरधाव ट्रक कंपाउंड तोडून घुसला घरात ! घराचे मोठे नुकसान; जीवित हानी टळली

11:58 AM Jun 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
भरधाव ट्रक कंपाउंड तोडून घुसला घरात   घराचे मोठे नुकसान  जीवित हानी टळली
Kolhapur Khochi
Advertisement

खोची वार्ताहर

खोची येथे भरधाव वेगाने येणारा आयशर ट्रक वळणाचा अंदाज न आल्याने संरक्षक भिंत तोडून घरावर धडकला. खोची -दुधगाव रस्त्यावरील जयसिंग पाटील यांच्या घराजवळ ही दुर्घटना घडली. यावेळी नेहा उदयसिंह पाटील या महिला जखमी झाल्या. तर संरक्षक भिंत, पाण्याची टाकी आणि जनावराच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले. संबंधित ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला. सकाळी साडेसात च्या सुमारास अपघाताची घटना घडली.

Advertisement

दुधगाव वेशीजवळ जयसिंग पाटील यांच्या घराजवळ गावात प्रवेश करताना वळण आहे.या ठिकाणाहून भैरवनाथ मंदिर व गावातील बसथांबा याकडे जाणारे रस्ते आहेत.यावेळी दुधगाव कडून येणारा आयशर ट्रक (MH-09-EM-1882) सांगलीहून माल घेऊन कोल्हापूर कडे जात होता.रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ कमी असल्यामुळे ट्रक वेगाने धावत होता. यावेळी या ठिकाणी असणाऱ्या वळणाचा अंदाज लवकर न आल्याने आयशर ट्रक संरक्षक भिंत तोडून गोठ्यावर जाऊन धडकला. यावेळी घरकाम करत असलेल्या नेहा उदयसिंह पाटील यांच्या अंगावर संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. तेथे जवळ असणाऱ्या सचिन पाटील यांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने जनावरांच्या जीविताला कोणताही धोका पोहोचला नाही.

या घटनेची माहिती मिळतात पोलीस पाटील मनोज सपकाळ यांनी भेट दिली. तसेच वडगाव पोलीस ठाण्यात घटनेची माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर ट्रक बाहेर काढून रस्ता वाहतूकीस सुरळीत केली. सदर अपघाताची वडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Advertisement

अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पेठ वडगाव ते दुधगाव हा रस्ता (दुधगावकडील एक किलोमीटर वगळता ) रुंदीकरणासह डांबरीकरण झाला आहे.त्यामुळे सदर रस्त्यावर कोल्हापूर,सांगली,आष्टा या मार्गांना जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्दळ वाढली आहे.यामध्ये वाहनांचा वेग हा काही वेळा मर्यादेपेक्षा जास्त असतो.तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले आहेत. त्यामुळे ही अपघाताचे प्रमाण वाढले आहे.याची दखल घेऊन संबंधित बांधकाम विभागाने मुख्य रस्त्यावर असणारी अतिक्रमण हटविण्याची मागणी ग्रामस्थातून केली जात आहे.

Advertisement
Tags :

.