कसबा बीड परिसरात चक्काजाम आंदोलन; शेतक-यांना वेगळे पाऊल उचलायला लावू नका : राजेंद्र सुर्यवंशी
कसबा बीड / वार्ताहर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनसमर्थात बीडशेड येथे ऊसाला दर मिळावा यासाठी चक्काजाम करण्यात आला.
बीडशेड येथील चौकात सकाळी ९ वाजलेपासून कसबा बीड, सावरवाडी, गणेशवाडी, बहिरेश्वर, शिरोली दुमाला यासह करवीरच्या पश्चिम परिसरातील गावातील शेतकरी एकत्र येण्यास सुरुवात झाली. तासभर चाललेल्या या आंदोलनात 'उसाला ३५०० दर व मागील ४०० रुपये मिळालेच पाहिजे'..'स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा'...राजू शेट्टींचा विजय असो', मिळालीच पाहिजे...'ऊस दरवाढ मिळालीच पाहिजे' आदी घोषणानी परिसर दणानून सोडला. सर्व शेतकऱ्यांनी १ तास चक्काजाम आंदोलन केले.त्यामुळे रस्त्याच्या चारही बाजूला दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
यावेळी राजेंद्र सूर्यवंशी यांनी "आंदोलन शांततेत सुरू असून दमदाटी करून उसाची वाहतूक करू नका. पुढचे पाऊल उचलायला लावू नका. ज्यामुळे आंदोलनाला वेगळे वळण लागेल. त्यामुळे जे कोणी ऊस वाहतूक करतील ते शेतकरीविरोधी असल्याचे समजले जाईल. वाढलेल्या साखर दराचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे." असे मनोगत व्यक्त केले. कॉ. डी.एम.सूर्यवंशी यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलआंदोलनात कसबा बीड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.