कोल्हापूर बनतंय उडता पंजाब
कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
गोवा बनावटीच्या दारुचा महापूर,, अंमली पदार्थांची तस्करी, तसेच गुटख्याची छुप्या मार्गाने होणारी वाहतुक यापूर्वी जिह्यात होत होती. मात्र आता कोल्हापूर जिह्यात गांजासोबतच एम. डी. ड्रग्ज, चरस, कोकेन, अफुला जिह्यातून मागणी वाढली आहे. यातूनच कोल्हापूर जिल्हा नशेच्या पदार्थांची सप्लाय चेन बनला आहे. पोलिसांनी या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे, मात्र अंमली पदार्थांचे तस्कर दररोज नवनवीन मार्गाने याचा पुरवठा करत आहेत. गोवा, राजस्थान, ओरिसा, पश्चिमबंगाल पासून हिमाचलप्रदेश येथील अंमली पदार्थांना कोल्हापूरात मागणी आहे.
जिह्यात यापूर्वी गोवा बनावट दारू, गांजाची तस्करी अत्यंत छुप्या पद्धतीने मर्यादीत स्वरुपात चालायची. मात्र गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरात गांजापाठोपाठ एम. डी. ड्रग्ज, चरस, कोकेन, अफुची मागणी वाढली आहे. नशाकरणाऱ्या तरुणाईची संख्याच वाढली असल्याने मागणी तसा पुरवठा होत आहे. कोल्हापूरात गांजाला विड, नाल, मटेरियल, चॉप्स या टोपण नावाने ओळखले जात आहे. गोव्यातून एमडी ड्रग्जची तर राजस्थान, ओरिसा, पश्चिमबंगाल पासून हिमाचलप्रदेश येथून ओल्या गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात कोल्हापूरात होत आहे. पोलिसांनी कारवाई करुन संपूर्ण साखळी नष्ट करण्याची गरज आहे. नुकत्याच केलेल्या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणनच्या पथकाने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर येथील विक्रेत्यांना जेरबंद करुन साखळी तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र या कारवाईमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे.
- दोन वर्षातील आकडेवारी
2024 मधील कारवाया
एकूण : 115 केस
एकूण आरोपी : 183
गांजा : 100 किलो
चरस : 45 ग्रॅम
अफू : 42 किलो 100 ग्रॅम
कोकेन : 133 ग्रॅम
एमडी : 64 ग्रॅम
मुद्देमाल किंमत : 69 लाख रुपये
2025 मधील कारवाया
एकूण 177
अटक आरोपी : 262
जप्त केलेला गांजा : 270 किलो
जप्त केलेले एमडी : 23 ग्रॅम
जप्त केलेला अफू : 12 किलो
एकूण मुद्देमाल : 60 लाख रुपये
गांजा सेवन करणाऱ्यांवरही कारवाई
2024 : गांजा सेवन : 74
2025 : गांजा सेवन : 119 (मे अखेर)
- रेल्वेतून होते तस्करी
कोल्हापूर येणारा गांजा हा हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, शिमोगा, सोलापूर, पंढरपूर येथून येत आहे. गोव्यासह कोकण किनारपट्टीवरुन तसेच मुंबईतून एमडी, कोकेन येत आहे. उत्तरप्रदेश येथून अफूची तस्करी होत आहे. येथून रेल्वेतून तस्कर गांजा घेवून कोल्हापूरात येत आहेत. मिरज, इचलकरंजी तसेच हातकणंगले परिसरात यांचे डंपीग असल्याचे समोर आले आहे.
- 5 हजारचा गांजा 15 हजार रुपयांना
हिमाचल, ओडीसा या भागात 5 हजार रुपये किलो प्रमाणे गांजा मिळत आहे. तस्कर हाच गांजा कोल्हापूरात 12 ते 15 हजार रुपये किलो प्रमाणे विकत आहेत. किरकोळ विक्रेते याच्या पुड्या करुन 10 ग्रॅम गांजा 150 ते 200 रुपयांना विकत आहेत. एमडीच्याही अशाच प्रकारे विक्री केली जात आहे. 2 किलो 300 ग्रॅमची एक पेटीच तयार करण्यात येते. हीच पुढे विक्रेत्यांना दिली जाते. 1 ग्रॅम एमडीची किंमत गोवा येथे 1 ते 1500 इतकी आहे. याचीची विक्री कोल्हापूरात 2500 पासून पुढै केली जाते.
- परप्रांतीयांचा सहभाग उघड
अफू, गांजा आणि अंमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये बहुतांशी परप्रांतीय नागरीकांचा सहभाग उघड झाला आहे. गांधीनगर, पाचगांव, आर. के. नगर तसेच विविध ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवायांमध्ये परप्रांतीयांना अटक केली आहे. फरशी बसविणे, सेंट्रीग, गवडी काम यासह ट्रक ड्रायव्हर, जेसीबी पोकलँड चालविण्याच्या निमीत्ताने परप्रांतीय कामगार कोल्हापूरात येत आहेत.
- गांजाची शेती
कोल्हापूर जिल्हा उसाच्या शेतीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. सध्या उसासोबत गांजाची शेती करण्याकडे काही जणे वळले आहेत. अल्पावधीत जास्तीत जास्त पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात गांजाची शेती करण्याकडे पावले वळत आहेत. उसामध्ये गांजाचे पिक झाकले जात असल्यामुळे याचाच फायदा काही शेतकरी घेत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने माद्याळ (ता. कागल) येथे दिनकर कृष्णा राणे याच्या शेतातून 12 किलो गांजा तर शेळकेवाडी जयदीप शवंत शेळके याच्या शेतातून 15 किलो गांजा जप्त केला होता.
- सिलावती आणि अलमेडा प्रकारचा गांजा
गांजा हा ओल्या आणी सुक्या प्रकारामध्ये मिळतो. गांजाची पाने वाळवून त्याचा नशा केला जातो. यामुळे वाळवलेल्या गांजाची किंमत जास्त आहे. वाळवलेल्या गांजाला अधिक मागणी असून, त्याची किंमतही जास्त आहे. ओला गांजाची किलोवर विक्री केली जाते तर सुक्या गांजाची पुडीतून विक्री करण्यात येते. कोल्हापूरात विक्री करण्यात येणारा गांजा हा सिलावती किंवा अलमेडा या प्रकारातील आहे. सिलावती रफ प्रकारचा असतो, तर अलमेडा हा उच्च प्रतिचा गांजा आहे.
- नशेतून वाढते गुन्हेगारी
नशा केल्यानंतर स्वत:वरील नियंत्रण हरवले जाते. यामुळेच गुन्हेगार एखादा गंभीर गुन्हा करण्यापूर्वी नशेचा अंमल करतात. तसेच नशा करण्यास विरोध केल्यामुळेही अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. हुतात्मा गार्डन येथील खून हा नशेबाजांना विरोध केल्याच्या कारणातून झाला होता. गांधीनगर रेल्वे स्थानक परिसरात एकाचा डोक्यात दगड घालून निघृणपणे केलेल्या खूनप्रकरणी व्यसनाच्या आहारी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांना पकडले, गांजासह इतर अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून हाणामारीचे गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढत आहे.