Kolhapur Crime News : आजीचा खून करून लंपास केलेले दागिने हस्तगत
मित्राकडे ठेवण्यासाठी दिले होते १३ तोळे दागिने
कोल्हापूर : चहामध्ये विषारी पावडर मिसळून चैनीसाठी नातवाने आजीचा खून करून तिचे १५ तोळे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी प्रेम परशुराम मिजंगडे (वय २०, रा. फुलेवाडी रिंगरोड) याला अटक करण्यात आली.
प्रेमने मित्राकडे ठेवण्यास दिलेले दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली.
याबाबत माहिती अशी की, ऋणमुक्तेश्वर येथील भाजी मंडईमध्ये सोमवार (१६ फेब्रुवारी) रोजी उषा मारुती मिजंगडे (वय ७२) यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
उषा मिजंगडे यांच्या हातातील १३ तोळे दागिने गायब असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने याचा समांतर तपास सुरु केला होता. आजीच्या चहामध्ये विषारी पावडर मिक्स करून तिचा खून केल्याची कबूलीही त्याने पोलिसांसमोर दिली. दरम्यान प्रेमने आजीचे दागिने शाळेतील मित्राकडे ठेवण्यासाठी दिले होते.
हे १३ तोळे दागिने पोलिसांनी गुरुवारी जप्त केले आहेत. आपल्या घरातील दागिने असून, काही दिवसांसाठी बाहेर निघाली आहे. आल्यानंतर दागिने परत घेऊन जातो असे सांगून त्याने दागिने मित्राकडे ठेवण्यास दिल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुवारी त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, रविवारपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली.