कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapuri Gold : जगात भारी कोल्हापूरी कलाकारी, देशभरात जातात कोल्हापूरी सोन्याचे मणी!

04:47 PM Apr 30, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

कोल्हापूरच्या कारागिरांनी मणी तयार करण्याची परंपरा जपली आहे

Advertisement

By : सुधाकर काशीद

Advertisement

कोल्हापूर : सोन्याचे मणी बहुतेक सर्व अलंकारात असतात. गृहिणीच्या रोज घालण्याच्या अलंकारासोबतच ठेवणीच्या किंमती अलंकारातही नक्षीकामाने मढवलेले मणी असतात. किंबहुना मण्यांशिवाय अलंकार पूर्णच होऊ शकत नाही. हे लाखेचे मणी कोल्हापूरशिवाय अन्यत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार होत नाहीत. कोल्हापूरच्या कारागिरांनी मणी तयार करण्याची परंपरा जपली आहे. गृहिणींचे अलंकार सजवण्यात या झळझळीत सोन्याच्या मण्यांचा मोठा वाटा आहे.

कोल्हापुरातील अडीच ते तीन हजार लोकांचा सोन्याचे मणी तयार करणे हा व्यवसाय आहे. देशाच्या सर्व सुवर्ण बाजारात या मण्यांना मोलाचे स्थान आहे. कारण अलंकाराचे स्वरूप कितीही बदलले तरी त्याच्या सजावटीत मणी असणे अपरिहार्यच आहे. मणी तयार करण्यासाठी अगदी कागदा इतक्या पातळ सोन्याचा पाष्ठा काढला जातो. म्हणजेच वजनाला हलक्या स्वरूपात सोन्याचा पत्रा तयार होतो. तेवढ्या आकाराचा मणी करायचा आहे, त्या हिशोबाने हा सोन्याचा पत्रा कापला जातो. तो पत्रा मंद आचेवर तापवला जातो. त्याच आचेवर पत्रा हळूहळू गोलाकार आकार घेतो. त्यानंतर या मण्यांत लाख भरली जाते,

पॉलिश केले जाते. या तयार मण्यांना अलंकारात मानाचे स्थान मिळते. म्हटलं तर, ही मणी तयार करण्याची प्रक्रिया खूप किचकट आहे. पण मणी तयार करण्यात कोल्हापूरकरांचा हात बसला आहे. कोल्हापूरच्या सोन्याच्या उलाढालीत या मण्यांचा मोठा वाटा आहे.विशेष हे की मणी बनवण्याचा स्वतंत्र कोर्स, प्रशिक्षण वगैरे कोणताही प्रकार कोल्हापुरात नाही. फक्त एकमेकाचे बघून, प्रक्रिया मनापासून ध्यानात घेऊन असंख्य तरुण-तरुणी महिला या मण्याला आकार देत आहेत.

एक ग्रॅम सोन्यात साधारण 120 ते 140 मणी बनवण्याचे त्यांच्याकडे कसब आहे. कोल्हापुरात सराफ बाजार, पापाची तिकटी, लक्ष्मी गल्ली, दत्त गल्ली, शनिवार पेठ, यादवनगर, उतरेश्वर परिसरात मणी घडवला जातो. लक्षतीर्थ वसाहतीत तर अनेक कुटुंबांना या सुवर्ण मण्यांनीच आधार दिला आहे. कामाच्या निमित्ताने लाखो रुपये किमतीचा सोन्याचा (पाष्ठा) पत्रा त्या कुटुंबात दिला जातो. केवळ विश्वासावर आणि नात्यावर हा सारा व्यवहार चालतो.

अलीकडे पर प्रांतातून कोल्हापुरात आलेल्या कारागिरांनी सोने घेऊन पोबारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. पण शहराच्या अगदी मध्यवस्तीत जपलेल्या या व्यवसायात स्थानिक कारागिरांकडून क्वचितच गडबड घोटाळा झाला आहे. मणी बनवण्यासाठी जे कारागीर आहेत त्यांचे कौशल्य खूप वेगळे आहे. याशिवाय या व्यवसायातील प्रमुख ज्येष्ठ मंडळी तर यात वाक्बगारच आहेत. त्यामुळे हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने जपला गेला आहे. अस्सल सोन्याची संबंधित हा सारा व्यवहार आहे. तरीही केवळ एका साध्या चिठ्ठीवर लिहून कारागिरांना सोने दिले जाते.

उदाहरणार्थ एक किलो सोने दिले तर त्यापासून किती मणी तयार होतील, याचा एक हिशोबच तयार झालेला असतो आणि त्यावरच हा सारा व्यवहार पूर्ण होतो. मणी तयार करणे अतिशय जोखमीचे असते. त्यात कौशल्यच वापरावे लागते. सोन्याचा पत्रा काढणे हे काम फक्त तांत्रिक असते. बाकी पुढचे सर्व काम हस्तकौशल्यावरच असते. या कामात थेट सोन्याशी संबंध असतो. स्थानिक कारागिरांनी केवळ हस्त कौशल्य व विश्वासावर हा व्यवसाय टिकवला आहे आणि देशभरात आपले वैशिष्ट्या जपले

देशभर मागणी

"आता लाखेचे मणी तयार करण्यावर जादा भर आहे. कोल्हापूरचे आम्ही व्यावसायिक ही कला जपण्यासाठी कायम प्रयत्न करतो. या मण्यांना देशभर मागणी आहे. कोल्हापूरच्या मण्यांना अलंकार बनवण्यात महत्त्वाचे स्थान आहे."

- संदीप ढणाल, व्यावसायिक

लवकरच मणी कारागिरांची संघटना

"मणी तयार करणारे कारागीर मोठ्या संख्येने कोल्हापुरात आहेत. मणी तयार करताना त्यावर खूप काम करावे लागते. आम्ही आमच्या कौशल्यावर हे सारे करतो. येत्या काही दिवसात आम्ही मणी तयार करण्यातले सर्व घटक एकत्र येऊन संघटना स्थापन करणार आहे."

- आनंदराव पाटील, लक्षतीर्थ वसाहत

कोल्हापुरी मण्यांचे देशभर कौतुक

"मणी तयार करण्यात कोल्हापूरचे वेगळे वैशिष्ट्या आहे. आम्ही तर सोन्याचा पाष्टा काढण्यापासून तयार मण्याचे पॉलिशही करतो. यासाठी स्थानिक कारागिरांचे कौशल्य खूप महत्त्वाचे ठरले आहे. वरवर साध्या दिसणाऱ्या कारागिरांचे कौशल्य देशातील सुवर्ण बाजारात कौतुकाचे ठरले आहे."

- निशिकांत मेथे, व्यावसायिक

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#gold rate today#gujari corner#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediacultural kolhapur
Next Article