...तर गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त झाले असते; संचालिका शौमिका महाडिक यांचा गौप्यस्फोट
गोकुळ बरखास्त करण्यात महाडिकांना रस नसल्याचे केले स्पष्ट
कोल्हापूर प्रतिनिधी
गोकुळच्या लेखापरिक्षणानंतर सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर उच्च न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढले आहे. यासंदर्भातील कारवाई मी थांबवली आहे. कारवाई पुढे गेली असती तर गोकुळचे संचालक मंडळ बरखासत होवून संचालक सहा वर्ष निवडणुकीसाठी अपत्रा ठरले असते, असा गौप्यस्फोट गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
संचालिका महाडिक म्हणाल्या, लेखापरिक्षणानंतर कारवाई पुढे न्यायची असेल तर ती मी नेवू शकले असते. पण व्यक्तीगत द्वेषातून महाडिकांनी गोकुळची बदनामी केली असे व्हायला नको म्हणून मी हि कारवाई थांबवली आहे. गोकुळ बरखास्त करण्यात किंवा काढून घेण्यात महाडिकांना रस नाही. पण गोकुळमध्ये सत्ताधाऱ्यांकडुन सुरु असलेला चुकीचा कारभार सभासदांपर्यंत उघड करणे हा आमचा उद्देश होता आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असल्याचे संचालिका महाडिक यांनी सांगितले.
गोकुळ अध्यक्षांना मिळालेल्या निनावी पत्रासंदर्भात बोलताना महाडिक म्हणाल्या, निनावी पत्रांना गोकुळकडून बेदखल केले जाते. पण संबंधित व्यक्तीची प्रस्थापितांना अंगावर घेण्याची ताकद नसेल, म्हणून त्याने निनावी पत्र देवून पशुसंवर्धन विभागातील औषध खरेदीमध्ये सुरु असलेला गैरकारभार उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गोकुळ प्रशासनाने या पत्राची गांभीर्याने दखल घेवून चौकशी करावी, अशी मागणी महाडिक यांनी केली.
त्या पुढे म्हणाल्या, गोकुळमधील भ्रष्टाचाराबाबत जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरे सत्ताधाऱ्यांनी दिली नाही. प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्याकडून उत्तर देण्याऐवजी व्यक्तीगत टिका होते. पशुखाद्य विभागातील भ्रष्टाचाराबाबत संबंधितांकडुन दंडासह रक्कम वसूल केल्याचे अध्यक्षांनी सांगितले आहे. तसेच यामधील सहभागी चार कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. पण हे चार लोकांचे काम नाही त्यामध्ये अन्य लोकही सहभागी असण्याची शक्यता आहे. एक संस्थानाही यामध्ये ज्या-ज्या संस्था सहभागी असतील त्या कोणाच्याही संस्था असल्या तरी यामधील सर्व संस्थांची चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी महाडिक यांनी केली.