कोल्हापूर-गोवा विमानसेवा 19 पासून ! तासात गोव्यात पोहोचणार
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर ते गोवा या मार्गावर 19 सप्टेंबरपासून विशेष विमानसेवा सुरू होणार आहे. कोल्हापूर विमानतळ येथून स्टार एअर या खासगी प्रवासी वाहतूक कंपनीने ही सेवा सुरू केली आहे. यामुळे कोल्हापुरातून आता तासातच गोव्यात पोहोचणार आहे.
कोल्हापुरातून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कोल्हापुरातून थेट गोव्याला रेल्वे सेवा नाही. एसटी किंवा खासगी वाहतुकीने बाय रोड गोव्याला जावे लागते. पाच तास यामध्ये जातात. शिवाय खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास होते. त्यामुळे अनेक दिवसांपासून कोल्हापूर-गोवा या मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. स्टार एअर या खासगी कंपनीने अखेर कोल्हापूर-गोवा विमान सेवा सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात 19 व 22 सप्टेंबर अशी दोन दिवसच ही विमानसेवा असेल. यानंतर प्रतिसाद पाहून कंपनी पुढील निर्णय घेणार आहे.
कोल्हापूरहून 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11. 30 वाजता गोव्याला विमान निघणार आहे. ते गोवा येथे 12:30 वाजता पोहोचणार आहे. याच दिवशी दुपारी एक वाजता गोव्याहून कोल्हापूरकडे विमान येणार आहे. सुमारे एक तासांचा हा प्रवास असणार आहे. याचबरोबर कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर 27 ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा सुरू होणार आहे. कोल्हापुरातून नागपूरलाही लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे.