कोल्हापूर- गोवा विमानसेवा पहिल्याच दिवशी फुल्ल!
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर-गोवा विमानसेवाला आज, गुरूवारपासून सुऊवात होत आहे. सकाळी 11.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथून गोव्याकडे जाण्यासाठी विमान टेक ऑफ करणार आहे. यासाठी पहिल्या दिवशीच विमानाच्या सर्व 50 सीट फुल्ल झाल्या आहेत. अशीच स्थिती राहिल्यास ही विमानसेवा कायमस्वरूपी सुरू राहणार आहे.
कोल्हापुरातून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या या मार्गावरील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे चारचाकी अथवा एसटीने जाताना त्रास सहन करावा लागतो. यामुळे कोल्हापूर-पुणे गोवा विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी होत होती. अखेर कोल्हापूर विमानतळ येथून स्टार एअरलाइन्स या खासगी प्रवासी वाहतूक कंपनीची कोल्हापूर ते गोवा मार्गावर विमानसेवा सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात 19 व 22 सप्टेंबर या दोन दिवसांसाठी विशेष विमानसेवेचे आयोजन केले आहे. कोल्हापूर ते गोवा महामार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळतो याची चाचपणी कंपनीच्या वतीने सुरू आहे. गुरुवार, 19 रोजी सकाळी 11.30 वाजता कोल्हापूरहून गोव्याकडे हे विमान जाणार आहे. पहिल्या दिवशी सर्व सीट प्रवाशांनी आगाऊ बुकिंग केले आहे. हे विमान गोवा येथे दुपारी 12.30 वाजता पोहोचणार आहे. याच दिवशी दुपारी एक वाजता गोव्याहून कोल्हापूरकडे विमान येणार आहे. कोल्हापूर विमानतळ येथे हे विमान दोन वाजता पोहोचणार आहे. 22 सप्टेंबर रोजी या वेळेनुसारच विमानसेवा सुरू राहणार आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापक नंदकुमार गुरव यांनी दिली आहे.