बालिंगा पुलावरून वाहतूक सुरूच राहणार ! राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांकडून अफवांचे खंडन
कृष्णात चौगले कोल्हापूर
बालिंगा पुलावरील वाहतूक आज दुपारपासून बंद करणार आहे अशी अफवा पसरली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री मुधाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बालिंगा पुलावरील वाहतूक आज बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले.
सध्या राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत त्यामधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पंचांगेच्या पाणी पातळीत आणखी दीड ते दोन फुट वाढेल असा अंदाज आहे. पण सद्यस्थितीत पावसाचा जोर कमी असल्यामुळे जरी राधानगरी धरणाचे पाणी पंचगंगा नदीपात्रात आले तरीदेखील पाणी पातळी न वाढता जैसे थे राहण्याची शक्यता आहे . तसेच राधानगरी धरणातून सध्या बाहेर पडलेले पाणी बालिंगा फुलानजीक येण्यासाठी सुमारे 13 ते 14 तासाचा अवधी लागतो. त्यामुळे जर पाणी पातळीत दीड ते दोन फुटांनी वाढ झाली तर मात्र बालिंगा पुलावरील वाहतूक बंद केली जाण्याची शक्यता आहे. पण किमान आज मध्य रात्रीपर्यंत तरी बालिंगा पुलावरील वाहतूक सुरू राहणार आहे. पाणी पातळीत होणाऱ्या बदलानुसार राष्ट्रीय महामार्ग विभाग उद्या शुक्रवारी आपला पुढील निर्णय जाहीर करणार आहेत.