Kolhapur-Gaganbawada Road: साबळेवाडी फाटा ते बालिंगा रस्त्यावरील भराव शेतकऱ्यांचा जीवावर
त्यामुळे या शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ताच राहिलेला नाही
By : प्रा. एस. पी. चौगले
वाकरे : सध्या कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणांमध्ये साबळेवाडी फाटा ते बालिंगे दरम्यान सुमारे 25 फूट उंचीचा भराव टाकण्यात आला आहे. हा भराव साबळेवाडी, दोनवडे, नागदेववाडी येथील शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. येथे दोन्ही बाजूला रस्ता न केल्यास शेतकरी संकटात सापडणार आहेत.
यापूर्वी राज्यमार्ग असणारा कोल्हापूर-गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत झाला आहे. या रस्त्याचे कोल्हापूर ते कळे दरम्यानचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र बालिंगे पुलाचे काम रखडले आहे. दरम्यान, साबळेवाडी फाटा ते बालिंगे दरम्यान महापुराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने या ठिकाणी सुमारे 25 फूट उंचीचा भराव टाकण्यात आला आहे.
त्यामुळे रस्त्याची उंची मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणी 3 बॉक्स वेल आणि 5 पाईप कलवेटर टाकण्यात येणार आहेत. या भरावामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली साबळेवाडी, दोनवडे आणि नागदेववाडी येथील शेतकऱ्यांची शेती 25 फूट खाली गेली आहे. त्यामुळे या शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ताच राहिलेला नाही.
शेतामध्ये वाहन नेणे, शेतीची मशागत करणे, जनावरांना वैरण आणणे यासाठी शेतकरी यापूर्वी बाजूला असणाऱ्या रस्त्याचा वापर करीत होते. मात्र आता या भरावामुळे शेतीक्षेत्र 25 फूट खाली गेले आहे. आता शेतात कसे जायचे, असा प्रश्न राहिला आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार आहे.
त्यावेळी 25 फूट खाली असणाऱ्या शेतातून ऊस कसा बाहेर काढायचा, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शनिवारी आंदोलन केले, अन् भरावाच्या बाजूने शेतीच्या कामासाठी रस्ता करून द्यावा, अशी मागणी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता करून देण्याच्या आश्वासन दिले आहे.
आम्हाला रस्ता करून द्यावा
नागदेववाडीचे माजी सरपंच शिवाजी ढेरे, महादेव कळके, शरद कळके, उत्तम दिवसे यांनी रस्त्याची उंची वाढल्याने शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. आम्हाला त्वरित रस्ता करून द्यावा, अशी मागणी केली आहे.
शेतासाठी रस्ता करून देऊ
ठेकेदार प्रतिनिधी मदन पाटील यांनी बॉक्सवेलचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतात जाण्यासाठी रस्ता करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.