छोट्या टपऱ्यांवर कारवाई...बड्या माशांकडे सोयीस्कर दुर्लक्ष; कर्नाटक , गुजरातचाही गुटखा कोल्हापुरात
अन्न औषध प्रशासनाची कारवाई छोट्या विक्रेत्यांपुरती मर्यादित
आशिष आडिवरेकर कोल्हापूर
महाराष्ट्रात बंदी असणाऱ्या गुटख्याची शहरासह जिह्यात राजरोसपणे अवैधरित्या विक्री सुरु आहे. याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने 4 दिवसांपासून धडक कारवाई सुरु केली आहे. मात्र ही कारवाई केवळ छोट्या पानटपरी चालकांपुरतीच मर्यादित आहे. मात्र शहरात येणारा गुटखा रोखण्यात अन्न औषध प्रशासन व पोलीसयंत्रणेस अपयश येत आहे. या बड्या विक्रेत्यांकडे अर्थपूर्ण हालचालीद्वारे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे.
महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची शहरासह जिल्ह्यात राजरोसपणे विक्री पानटपऱ्यांवर सुरु आहे. या विरोधात अन्न औषध प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. मात्र ही कारवाई केवळ पानटपऱ्यांपुरतीच मर्यादित आहे. पानटपरीमध्ये येणारा गुटखा कोठून येतो, त्याचे शहरातील जिह्यातील विक्रेते कोण, याची संपूर्ण माहिती अन्न औषध प्रशासनाकडे आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस या विभ येत नाही. केवळ छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करुन मोठ्या विक्रेत्यांकडे सोयीस्कर दुर्लक्षाचे काम सुरु आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई केवळ दिखावूपणाच असल्याचे चित्र आहे. यातून मोठ्या विक्रेत्यांना एक मॅसेज मिळाला असून त्या मोठ्या विक्रेत्यांनी तोडपाणी करण्यासाठी अन्न औषध प्रशासनाच्या पायऱ्या झिजवण्यास सुरुवात केली आहे.
दुचाकी, मोपेडवरुन शहरात विक्री
शहरात येणारा गुटखा पहिल्यांदा गांधीनगर येथे येतो. गांधीनगरमध्ये गुटख्याचे दोन मोठे डिलर आहेत. त्यांच्याकडून कोल्हापुरातील छोटे व्यावसायिक गुटखा विकत घेतात आणि पानपट्टीवर सप्लाय करतात. शहरात मुख्यत्वे दुचाकी आणि मोपेडवरुन गुटख्याची चोरटी वाहतूक होते.
लक्ष्मीपुरीतही यंत्रणा
गुटखा विक्रीची एक यंत्रणा लक्ष्मीपुरी परिसरातही कार्यरत आहे. लक्ष्मीपुरी परिसरात गुटख्याचे 5 ते 6 मोठे डिलर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे थेट निपाणी, जयसिंगपूर, इचलकरंजी येथून गुटख्याची आवक होते. लक्ष्मीपुरी गुटख्याचे शहरातील केंद्रस्थान आहे.
कर्नाटक पाठोपाठ गुजरात, मध्य प्रदेशमधून आवक
कोल्हापुरात यापूर्वी केवळ कर्नाटकातून गुटख्याची मोठ्या प्रमाणात आवक होत होती. आता मात्र गुटख्याचे प्रॉडक्शन गुजरात, मध्य प्रदेश येथूनही होत आहे. या ठिकाणचा गुटखाही कोल्हापुरात येण्यास सुरुवात झाली आहे. काही ट्रॅव्हल्समधून हा गुटखा गांधीनगर परिसरात डंम्प केला जात आहे. त्यानंतर याचे वाटप शहरात केले जात आहे.
कोल्हापुरातून गोव्यात तस्करी
मध्य प्रदेश, गुजरात येथून येणाऱ्या गुटख्याला कोल्हापूरपेक्षा जास्त मागणी गोव्यात आहे. त्यामुळे हा गुटखा कोल्हापुरात येऊन येथून गोव्याकडे पाठवला जात आहे. कोल्हापुरात ट्रॅव्हल्समधून आलेला गुटखा कंटेनर, भाजी, साखर आदी वाहतूक करणाऱ्या वाहनांतून गोव्याकडे पाठवला जात आहे. यापूर्वी गोव्यातून दारु कोल्हापुरात येत होती, आता कोल्हापुरातून गुटखा गोव्यात पाठवला जात आहे.
टपऱ्यांवर कारवाईपेक्षा विक्रेत्यांवर कारवाई करा
अन्न औषध प्रशासनाने 4 दिवसांपासून अवैध गुटखा विक्री विरोधात धडक मोहीम उघडली आहे. मात्र ही कारवाई केवळ छोट्या विक्रेत्यांवर केल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडून केवळ 500 ते 1 हजार रुपयांचा माल मिळत आहे. मात्र मोठ्या विक्रेत्यांवर कारवाईचे धाडस अन्न औषध व पोलीस करताना दिसत नाहीत. मोठ्या विव्रेत्यांना अभय देण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करुन मोठ्यांसोबत अर्थपूर्ण वाटाघाटीचा हा एक प्रयत्न असल्याचीही चर्चा पानपट्टी व्यावसायिकांत रंगली आहे.
15 दिवस जामिन नाही
महाराष्ट्रात प्रतिबंध असणाऱ्या गुटख्याची विक्री करताना आढळल्यास भारतीय दंडविधान संािता कलम 328, 188, 272, 273 सह अन्न व सुरक्षा मानदे कायदा 2006 कलम नुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येतात. यामध्ये संशयितास 15 दिवस जामिन मिळत नाही.