Kolhapur News | पेट्रोल-डिझेलला पर्याय; कोल्हापूरकरांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढता कल
कोल्हापुर (इकबाल रेठरेकर ) -इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्यासाठी नागरिक आता इलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी बाहनांना पसंती देत आहेत. वाहन विक्रेत्यांच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत ईव्ही वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.
एप्रिलमध्ये विक्रीचा उच्चांक यापूर्वी एप्रिल महिन्यात तब्बल १२५५ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. त्यामध्ये ११६१ इलेक्ट्रिक दुचाकी आणि ९४ इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांचा समावेश होता. सलग दोन महिन्यांतील ही बिक्री पाहता नागरिकांचा ईव्हीकडे वाढता ओढा स्पष्ट होत आहे.
शासकीय स्तरावरही ईव्हीला प्रोत्साहन
पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यातील अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी ताफ्यातील पारंपरिक इंधनावरील बाहनांचा वापर कमी करून इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार सुरू केला आहे. त्यामुळे सामान्य
नागरिकांमध्येही ईव्हीबाबत विश्वास वाढला असून विक्रीला चालना मिळत आहे. केंद्राच्या पीएम ई-ड्राईव्ह योजनेंतर्गत थेट सबसिडी सध्या बंद असली तरी परिवहन विभागाकडून आकारण्यात येणारा मोटार वाहन कर १०० टक्के माफ केला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने अधिक परवडणारी ठरत आहेत. मोटार वाहन कर १२ ते१४ टक्के पर्यंत आकारण्यात येत असतो. मात्र इलेक्ट्रिक वाहनासाठी हा संपूर्ण कर माफ केला आहे. त्यामुळे लोकांच्या पैशाची देखील बचत होत आहे.
पर्यावरणासह आर्थिक बचतीचा पर्यायसध्याच्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहने वापरणे हा केवळ आर्थिक बचतीचा पर्याय नसून देशाच्या तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठीही महत्त्वाचा पर्याय मानला जात आहे. पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठीही ईव्ही वाहने प्रभावी ठरत असल्याने आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पेट्रोल-डिझेलची प्रचंड मागणी कायम
इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असली तरी जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी अद्याप मोठ्या प्रमाणात कायम आहे. जिल्ह्यात रोज सुमारे पाच ते साडेपाच लाख लिटर पेट्रोलची विक्री होते. तर डिझेलची रोज सहा ते साडेसहा लाख लिटर विक्री होत असल्याची माहिती पेट्रोलियम व्यावसायिकांकडून मिळाली आहे.