एफआरपीसाठी कुणाला आंदोलन करण्याची गरज नाही : सदाभाऊ खोत
पट्टणकोडोली प्रतिनिधी
उसाच्या एफआरपी साठी केंद्र सरकारने प्रतिटन 300 रु जाहीर केले आहेत. त्यासाठी कोणाला आंदोलन करण्याची कोणतीही गरज नाही.असे सांगत राजू शेट्टींच्या आंदोलनावर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केली .इंगळी (ता. हातकणंगले) येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी मोदीनी आणलेल्या विविध कल्याणकारी योजना विषद केल्या..भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी देश सुरक्षित ठेवण्यासाठी मोदीनां साथ दया अशी हाक देत, इंगळी गावातील तरुणांनी एकजूट केल्याने धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळणार याबाबत कोणतीच शंका नाही असा विश्वास व्यक्त केला.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर आणि दलित मित्र अशोकराव माने यांनी मोदींचे हात बळकट करण्यासाठी व मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी धैर्यशील माने यांना निवडून देऊया अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी खासदार निवेदिता माने यांनी धैर्यशील माने यांनी मतदार संघाच्या विकासासाठी केलेली कामे सांगून इंगळी हे गाव माझं आहे असे म्हणत येथून मताधिक्य मिळणारच असा विश्वास व्यक्त केला. युवा सेना सदस्य शिवाजी जाधव म्हणाले,दादा हे दूरदृष्टी असलेल नेतृत्व आहे.मागच्या निवडणुकीत तरुणांच्या हातात दगड नाही तर पेन देणार असे ते म्हणाले होते.त्यानुसार त्यांनी एमआयडीसी , लॉजिस्टिक पार्क मंजूर करून आणले आहे.यामुळे मतदार संघात मोठा विकास होणार आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष शिरीष देसाई यांनी ही युती धर्म म्हणून आपण हातकणंगले तालुक्यातून अधिका अधिक मतदान मिळवून देणार असे वचन दिले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील,युवा मोर्चा अध्यक्ष विश्वास माने, वीरकुमार शेंडूरे,वैजयंती आंबी, सरपंच दादासाहेब मोरे,सदस्या स्वप्नाली भातमारे यांचे सह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिग्विजय खोत, प्रास्ताविक रावसाहेब पाटील यांनी केले.