वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू; उत्तूर-भादवण मार्गावरील घटना
उत्तूर: आजरा उत्तूर जाणाऱ्या मार्गावर भादवण तिट्यानजीक असणाऱ्या रविराज हॉटेल जवळ मडिलगे गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात होन्याळी (ता. आजरा) येथील जोतिबा पुंडलिक सुर्यवंशी वय ६० यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून रस्त्याच्या कडेला गवतात झोपलेल्या वृद्धाच्या डोक्यावरून चाक गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. चालकाने वाहनासह पलायन केले. याबाबत पंकज जोतिबा सुर्यवंशी (वय २८, रा. होन्याळी, ता. आजरा) यांनी वर्दी दिली.
सुर्यवंशी सकाळी नऊच्या सुमारास हॉटेल रविराज जवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला गवतात झोपलेले होते. अज्ञात वाहन चालकाने डोक्यावरून चाक घातले अन वाहन पसार झाले. सुर्यवंशी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, आजऱ्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब सरवदे, हवालदार पाहूरंग येलकर, ज्ञानदेव हजारे, संदीप म्हसवेकर, सुधाकर हुले आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
