कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

है या.. है या! आरोळी जुनीच पण दूध कट्टा नवा..

11:23 AM Apr 19, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

कोल्हापूरच्या म्हैसपालन आणि दूध दुभत्याचा व्यवसाय करणाऱ्यांनी दूध कट्ट्यावर दूध पिळण्याची परंपरा जपली आहे

Advertisement

By : सुधाकर काशीद

Advertisement

कोल्हापूर : है या! है या! ही आरोळी दूध कट्ट्यावरची. कोल्हापूरकरांच्या तर कानात अगदी फिट बसलेली. पण अलिकडच्या काळात थोडी कमी झालेली. कारण दूध कोठे तयार होते? तर दूध प्लास्टिक पिशवीत होते, असे उत्तर देणारी पिढी अलीकडच्या काळात वावरणारी. पण तरीही कोल्हापूरच्या म्हैसपालन आणि दूध दुभत्याचा व्यवसाय करणाऱ्यांनी दूध कट्ट्यावर दूध पिळण्याची परंपरा जपली आहे आणि त्यानिमित्ताने तरी कोल्हापूरच्या दूध कट्ट्यावर है या..है या! ही आरोळी आजही कानावर पडत आहे.

दूध कट्टा म्हणजे काय? तर रस्त्याकडेला म्हैस उभी असते. तिचे दूध ग्राहकांसमोर काढले जाते. हे दूध शक्यतो तेथेच बसून प्यायले जाते आणि धारोष्ण दूध म्हणजे काय आणि त्याची जाणीव त्याच्या चवीतून होते. असे दूध कट्टे आणि असे दूध काढण्याची व विकण्याची पद्धत खूप कमी ठिकाणी आहे आणि ही जी पद्धत सुरू आहे, ती तुलनेत कोल्हापुरातच मोठ्या संख्येने आहे. म्हणूनच कोल्हापूरच्या प्रमुख वैशिष्ट्यात या दूध कट्ट्यांचा प्राधान्याने समावेश आहे. या दूध कट्ट्यांना लवकरच नवे रूप येणार आहे. गंगावेस आणि मिरजकर तिकटी या प्रमुख दूध कट्ट्यांची पारंपरिक ओळख कायम ठेवून नव्याने बांधणी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसातच त्याचा वापरही सुरू होणार आहे.

कोल्हापूरच्या दूध कट्ट्यांना जुनी परंपरा आहे. त्यात गंगावेशितला दूध कट्टा खूपच जुना. कोल्हापूर धड शहर नाही आणि धड खेडे नाही. अशाच अवस्थेत होते. आजही काही भागात तसेच चित्र आहे. जुन्या काळात म्हैसपालन हा चांगला व्यवसाय होता. शनिवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, शिवाजी पेठ, बुधवार पेठ, मंगळवार पेठ, रंकाळा वेस, दुधाळी, शुक्रवार पेठ भागातील लोक या व्यवसायात होते. हिरवा चारा बारा महिने उपलब्ध. गवताळ माळामुळे या व्यवसायाला चांगला आधार मिळाला. म्हशी बांधण्यासाठी पुरेशी जागा होती आणि गंगावेशीत दुधाची विक्री होत होती. गंगावेश दूध कट्ट्यावरच्या रेलिंगला म्हशी बांधल्या जायच्या व समोर रस्त्यावर म्हशीचे दूध काढले जायचे. दूध काढल्या-काढल्या ते गिऱ्हाईकाला दिले जायचे.

ताजे धारोष्ण दूध काही मिनिटात रिचवले जात होते. कोल्हापूरात तालमी आणि पैलवान, त्यामुळे दूध कट्ट्यावर दूध पिण्यासाठी लुंगी बांधून आलेले पैलवान हमखास दिसायचे, आणि या चांगल्या पैलवानांना दूध कट्ट्यावर पाहण्यासाठी शौकिनांचा गराडा पडायचा. दूध पिण्यासाठी कप नाही. फुलपात्र नाही. ग्लास नाही. हे पैलवान चक्क स्टीलची छोटी बादली घेऊन यायचे व ती बादलीच तोंडाला लावत होते. दूध कट्ट्यावर रात्री एक ते दीड वाजेपर्यंत दूध विकले जात होते. अर्थात काळाच्या ओघात गंगावेशबरोबरच पापाची तिकटी, महापालिकेची पिछाडी, मिरजकर तिकटी, बी. टी. कॉलेज शाहूपुरी येथे दूधकट्टे तयार झाले.

गंगावेशीतील वर्दळ त्यामुळे कमी झाली. पण गंगावेश आणि दूध कट्टा ही ओळख मात्र कायमच राहिली. आता गंगावेश, मिरजकर तिकटी दूध कट्ट्याच नूतनीकरण सुरू आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी खास कोल्हापुरी टच देत त्यासाठी निधी दिला आहे. त्यात म्हशीसाठी शेड, म्हशी बांधण्यासाठी खुंट्या, पाण्याची सोय, आकर्षक कमान अशी रचना आहे. गंगावेशीत आणि मिरजकर तिकटीला शेड बांधणे सुरू आहे. दूध व्यवसायिकांशी काय सुविधा असाव्यात, अशी चर्चा करून सुविधा देण्यात येणार आहेत. दूध कट्ट्याची बाह्यरचना आकर्षक असणार आहे.

कोल्हापुरात 250 ते 300 म्हशी पालन करणारे आणि दूध विक्री करणारे व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे सरासरी 3 ते 6 दूधाच्या म्हशी आहेत. सगळ्याच एकावेळी दूध देतात, असे नाही. पण सरासरी एक म्हैस 5 ते 6 लिटर दूध देणारी आहे आणि या परंपरागत व्यवसायाला त्यामुळे जीवंतपणा आहे. म्हशी जणू त्यांच्या घरचाच घटक झाल्या आहेत. बिजली, घुंगरू, राणी, गोकुळ, पैंजण, सोनम, झेन, दिमाग, पोलाद, बांगडी अशी या म्हशींची वेगवेगळी नावे आहेत.

खास म्हशीसाठी त्यांच्या शिंगात चांदीचे कोंदण, पायात चांदीचे तोडे, कपाळावर चांदीची सजावट केली गेली आहे. गंगावेश दूध कट्ट्याला ‘गोकुळ’ असे जे नाव आहे ते नाव एका म्हैशीचेच आहे. कोल्हापुरातील म्हशीच्या दूधाची उलाढाल मोठी असल्याने म्हैस व्यवसायाला चांगले स्थान आहे. आता काही दिवसात गंगावेश, मिरजकर तिकटी हे दूध कट्टे नव्या रचनेत खुले होत आहेत. त्यामुळे या हे कट्ट्यावरची कोल्हापूरच्या समाज जीवनाशी जोडून गेलेली आरोळी पुन्हा कानावर पडणार आहे.

है या ! म्हणजे दूध आहे या, दूध आहे या.., अशी मूळ आरोळी आहे. पण तिचे रूपांतर है या..! असे झाले आहे आणि ही आरोळी अगदी परवलीची ठरली आहे. मालकाची है या! अशी आरोळी कानावर पडल्याशिवाय म्हैशीला पान्हा फुटत नाही, अशीही परिस्थिती आहे.

पाण्याची सुविधा...

"नवीन दूध कट्ट्यावर पाण्याची भरपूर सोय म्हैस दूध व्यवसायिकांना अपेक्षित आहे. कारण दूध कट्टा स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे."

-भाऊ करंबे, अध्यक्ष, म्हैस व दूध व्यावसायिक असोसिएशन कोल्हापूर.

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#kolhapur News#Rajesh Kshirsagar#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaGangavesh Talimkolhpur dukh katta
Next Article