कोल्हापूर विभाग दशकापासून राज्यात अव्वल
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा किंवा दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा असो कोल्हापुरने आपली शैक्षणिक गुणवत्ता कायम टिकवून ठेवल्याचे निदर्शनास येते. कोल्हापूर विभागाने गेल्या दशकभरापासून राज्यात दोनवेळा दुसरा तर चारवेळा तिसऱ्या स्थानावर राहिले आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागाने बारावी परीक्षेत नेहमीच अव्वल स्थान मिळवल्याचे सिध्द होते. कोल्हापुरातील ज्युनिअर कॉलेजच्या प्रयत्नामुळेच हे शक्य आहे. दिवसेंदिवस दहावी-बारावी परीक्षेतील निकालावरून शैक्षणिक गुणवत्ता वाढ होत असल्याचे दिसते. तसेच कोल्हापूर विभागाने यंदाही 93.28 टक्के गुण मिळवत राज्यात दुसरा नंबर पटकावला आहे. त्यामुळे राज्यभरातून कोल्हापूर विभागाचे कौतुक होत आहे.
कला, क्रीडासह शैक्षणिक गुणवत्तेमध्ये कोल्हापूर नेहमीच अव्वल स्थानी राहिले आहे. जिल्हा परिषद किंवा महापालिकेच्या शाळांनी पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्याचप्रमाणे दहावी व बारावी परीक्षेतही विद्यार्थ्यांनी कोल्हापूरचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. ऐवढेच नाही तर शेकडो शाळांचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागतो. कोल्हापूर विभाग राज्यात नेहमीच पहिल्या तीनमध्ये येतो. गतवर्षीपेक्षा यंदा निकालाचा टक्का घसरला असला तरी राज्यात व्दितीय क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर विभागात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण दरवर्षी एक टक्क्याने वाढत आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर विभागात कायम प्रथम क्रमांक मिळवतो. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचीही शैक्षणिक गुणवत्ता दिसून येते.
- खेळाडूंच्या संख्येतही वाढ
कोल्हापूर विभागात जिल्हा, विभागीय, राज्य राष्ट्रीय खेळाडूंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदा तब्बल 2 हजार 333 विद्यार्थ्यांना नियमांच्या अधीन राहून सवलतीचे गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे क्रीडा प्रकारातही कोल्हापूरने आपला दबदबा ठेवला आहे.
- कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न
राज्य शासनाच्या आदेशानुसार कोल्हापूर विभागीय मंडळाच्या वतीने कॉपीमुक्त परीक्षेसाठी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रयत्न केले. शिक्षक संघटनांच्या विरोधाला न डगमगता त्यांनी कॉपीमुक्त परीक्षा मोहिम राबवली. त्यामुळे कॉपीच्या गैरप्रकाराचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास येते.
- दहा वर्षात राज्यातील कोल्हापूर विभागाचे स्थान
वर्ष टक्के राज्यात स्थान
2015 92.13 तिसरा
2016 88.10 तिसरा
2017 91.40 चौथा
2018 91.00 दुसरा
2019 87.12 पाचवा
2020 94.42 तिसरा
2021 99.67 तिसरा
2022 95.07 चौथा
2023 93.28 पाचवा
2024 94.24 चौथा
2025 93.28 दुसरा
- भविष्यातही कोल्हापूर विभाग पुढे राहील
दहावी बारावी परीक्षेसह शिक्षण विभागाच्या सर्व योजना-उपक्रम व इतर स्पर्धा परीक्षेत कोल्हापूर विभाग पुढे राहील, यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. शिष्यवृत्ती, आधार व अपार नोंदणी, स्कॉफ, उल्लास, निपुण महाराष्ट्र या उपक्रमांवर विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी सध्या लक्ष केंद्रित केले आहे.
राजेश क्षीरसागर (विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर मंडळ)