कोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय
कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2025 मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर झाला. राज्याचा निकाल 94.10 टक्के लागला असून कोकणचा 98.82 तर कोल्हापूर विभागाचा निकाल 96.87 टक्के लागला आहे. सलग दहा वर्षापासून राज्यात व्दितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच विभागीय मंडळात कोल्हापूर जिल्ह्याचा 96.87 टक्के निकाल लागला असून प्रथम, सातारा 96.75 टक्के निकाल लागला असून विभागात व्दितीय, तर सांगलीचा 96.52 टक्के निकाल लागला असून विभागात तृतीय क्रमांक आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 0.58 टक्केनी निकालात घट झाली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 2.45 टक्केनी अधिक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह कोल्हापूर विभागात मुलींनीच बाजी मारली आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर विभागीय मंडळात 2 हजार 327 शाळा असून दहावीची परीक्षा 357 परीक्षा केंद्रावर 1 लाख 29 हजार 421 पैकी 1 लाख 25 हजार 380 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 96.87 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 53 हजार 726 विद्यार्थ्यांपैकी 52 हजार 394 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 97.52 टक्के निकाल लागला आहे. सातारा जिल्ह्यात 37 हजार 203 विद्यार्थ्यांपैकी 35 हजार 997 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 96.75 टक्के निकाल लागला आहे. सांगली जिल्ह्यात 38 हजार 492 विद्यार्थ्यांपैकी 36 हजार 989 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 96.09 टक्के निकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 2.45 टक्के जास्त आहे. यंदा कोल्हापूर विभागात परीक्षेत्तोर गैरप्रकार करणाऱ्या 6 विद्यार्थ्यांची संबंधीत विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली आहे. यंदा 66 हजार 630 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 95.74 टक्के प्रमाण आहे. तर 58 हजार 750 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून 98.19 टक्के प्रमाण आहे. त्यामुळे मुलांपेक्षा 2.45 टक्के मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. दहावीचा ऑनलाईन निकाल मंडळाच्या https://sscresult.mahahsscbord.in, http://sscresult.mkcl.org या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुतर्मल्यांकन करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे. त्यासाठी 14 ते 28 मे या कालावधीत नियोजित शुल्क भरून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा. दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी श्रेणी व गुणसुधार परीक्षा जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये घेतली जाणार आहे. त्यासाठी 15 मेपासून राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचा आहे. तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी केले आहे. यावेळी सहसचिव बी. एस. किल्लेदार, वरष्ठि अधिक्षक तथा सहाय्यक सचिव एस. वाय. दुधगांवकर, वरिष्ठ अधिक्षक एच. के. शिंदे, वरिष्ठ अधिक्षक जे. एस. गोंधळी, पर्यवेक्षक लिपिक एस. पी. नलवडे, आर. एल. इनामदार, आर. आर. देसाई, एस. एम. गोसावी आदी उपस्थित होते.
- सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी
दहावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेनुसार सवलतीचे गुण दिले जातात. कोल्हापूर विभागात चित्रकलेसाठी 30 हजार 693, लोककलेसाठी 18 हजार 589, शास्त्रीय कलेसाठी 1 हजार 681 आणि क्रीडासाठी 4 हजार 345 असे एकूण 50 हजार 997 विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.
- श्रेणीनुसार विद्यार्थी संख्या
दहावीच्या परीक्षेत प्रथम, व्दितीय आणि उत्तीर्ण श्रेणीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 75 टक्केपेक्षा जास्त गुण 46 हजार 761 विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. तर 60 ते 75 टक्केपर्यंत 44 हजार 155 विद्यार्थींनी गुण मिळवले आहेत. 55 ते 60 टक्केपर्यंत 27 हजार 140 विद्यार्थ्यांनी गुण मिळवले आहेत. तर 7 हजार 324 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.