For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कोल्हापूर जिल्ह्यात 'शिक्षक'साठी ८८.६२, 'पदवीधर'साठी ६३.८३ टक्के मतदान

10:23 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोल्हापूर जिल्ह्यात  शिक्षक साठी ८८ ६२   पदवीधर साठी ६३ ८३ टक्के मतदान
Advertisement

कोल्हापूर: पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षक मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, तर पदवीधर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी तुलनेने कमी राहिली. शिक्षक मतदारसंघात ८८.६२ टक्के, तर पदवीधर मतदारसंघात ६३.८३ टक्के मतदान झाले. शिक्षकसाठी अधिक तर पदवीधरसाठी कमी झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडेल याची उत्सुकता आता लागून राहिली आहे.
मतदानासाठी कोल्हापुरात दिवसभर चुरस दिसली. महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रांना भेटी दिल्या, तर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी केंद्राबाहेर ठाण मांडल्याने राजकीय वातावरणात चुरस पाहायला मिळाली.

Advertisement

शिक्षक मतदारांचा मतदानातील सहभाग अधिक राहिला, तर मोठ्या मतदारसंख्येच्या पदवीधर मतदारसंघात मतदानाचा आकडा तुलनेने कमी राहिला. त्यामुळे पदवीधर मतदारांचा मतदानातील सहभाग हा चर्चेचा विषय ठरला. जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी एकूण १२ हजार २९९ मतदारांपैकी १० हजार ८९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ८८.६२ टक्क्यांवर पोहोचली. दुसरीकडे, पदवीधर मतदारसंघात एकूण एक लाख १४ हजार ५६२ मतदारांपैकी ७३ हजार १२८ मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात ६३.८३ टक्के मतदानाची नोंद झाली. दोन्ही मतदारसंघांतील मतदानाच्या टक्केवारीत सुमारे २४.७९ टक्क्यांची तफावत दिसून आली.

सकाळी संथ गती; दुपारनंतर वेग
मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात दोन्ही मतदारसंघांत मतदानाचा वेग कमी होता. सकाळी दहापर्यंत सुमारे १४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढत गेली. दुपारी बारापर्यंत मतदानाने २५ ते ३५ टक्क्यांचा टप्पा गाठला. शिक्षक मतदारसंघात दुपारी दोनपर्यंत ६१.१८ टक्के मतदान झाले होते. याचवेळी पदवीधर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ४४.९९ टक्के होती. शिक्षक मतदारांचा वाढता प्रतिसाद व पदवीधरची संथ गती यांमधील फरक स्पष्टपणे जाणवत होता.

Advertisement

केंद्राबाहेर राजकीय हालचालींना वेग
जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेटी देऊन मतदानाच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी केंद्राबाहेर मदत कक्ष उभारले होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी आणि नेत्यांच्या भेटींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.

Advertisement
Tags :

.