For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

दुष्काळामुळे कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीला ब्रेक; अंतिम मतदार यादी लांबणीवर

11:57 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुष्काळामुळे कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीला ब्रेक  अंतिम मतदार यादी लांबणीवर
Advertisement
कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेवरही झाला आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावरील हरकतींच्या सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. मात्र, 3 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी आता लांबणीवर पडली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया तूर्तास थांबली आहे.

राज्य शासनाने 27 ऑक्टोबर रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यासंदर्भात शासन आदेश जारी केला. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचा थेट परिणाम कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर झाला आहे.

Advertisement

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी संबंधित संस्थांकडून ठराव मागवून त्यानुसार प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली होती. ही यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर हरकती मागविण्यात आल्या. प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली होती. त्यानंतर 3 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, शासनाच्या स्थगिती आदेशामुळे या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.

निवडणुकीसाठी आणखी वर्षभर प्रतीक्षा?

आगामी काळातील हवामान आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करता कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक ऑक्टोबर 2027 मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, निवडणुकीचा अंतिम कार्यक्रम शासनाच्या पुढील आदेशांवर अवलंबून राहणार आहे.

Advertisement

फेब्रुवारीपासून उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यास पाणीटंचाई आणि दुष्काळाचे संकट पुन्हा गंभीर होऊ शकते. त्यानंतर जूनपासून पावसाळा सुरू झाल्यास निवडणूक प्रक्रिया राबविण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इच्छुकांच्या प्रतीक्षेत वाढ

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. मतदार यादीवरील हरकतींची सुनावणी पूर्ण झाल्यामुळे पुढील प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाच्या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रिया अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली आहे.

आता शासनाकडून पुढील आदेश कधी जारी होतो आणि निवडणूक प्रक्रिया पुन्हा कधी सुरू होते, याकडे सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि सभासदांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.