एकाच व्यासपीठावर येऊन चर्चा करा! राजू शेट्टी यांना प्रकाश आवाडे यांचे आवाहन
राजू शेट्टी यांनी माझ्याबरोबर एकाच व्यासपीठावर येऊन चर्चा करावी. पण तत्पूर्वी मी शेतकरी मेळावा घेऊन राजू शेट्टींच्या प्रश्नांना योग्य उत्तर देईन असे आवाहन जवाहर साखर कारखान्याचे चेअऱमन आमदार प्रकाश आवाडे यांनी दिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे सुरु केलेल्या उपोषणानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना साखर कारखानदारांच्या घरी जाऊन खर्डा भाकरी खाण्याच्या सुचना दिल्या होत्या. आज स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरी जाऊन आवाडे यांच्या बरोबर खर्डा भाकरी खाल्ली.
आज सकाळीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जवाहर साखर कारखान्याचे चेअरमन आमदार प्रकाश आवाडे यांचे घर गाठले. सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या हातात खर्डा भाकरी बांधलेलं गाठोडं होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी चेअरमन आवाडे यांची भेट घेतली. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्वता खर्डा भाकर खाऊन ती प्रकाश आवाडेंनाही चारत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर आवाडे यांनी शेतकऱ्यांना दिवाळीचा लाडून देऊन त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार प्रकाश आवाडे यांनी राजू शेट्टींना आवाहन देताना म्हटले आहे कि, "राजू शेट्टी यांनी माझ्याबरोबर एकाच व्यासपीठावर येऊन चर्चा करावी. राजू शेट्टींच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी भर सभेत उत्तर देईन. पण त्याअगोदर मला शेतकऱ्यांची सभा घेऊनच त्याचे उत्तर देईन." असे यांनी म्हटले आहे. प्रकाश आवाडे यांनी दिलेलं हे आवाहन स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारलं असून येत्या काळात राजू शेट्टी आणि प्रकाश आवाडे यांच्या चर्चा होणार का ? याचे चित्र स्पष्ट होईल.