दिवाळीच्या ऑनलाइन ऑफर्सच्या मोहात पडू नका; फसवणुकीचा धोका!; अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास खात्यातील रक्कम होऊ शकते गायब
सध्या ऑनलाइन खरेदीसाठी बाजारपेठेत जाण्याची गरज उरलेली नाही. मोबाइलवरून वस्तू पाहून आणि निवडून खरेदी करता येत असल्याने अनेकजण ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देतात. मात्र, याच सुविधेचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार आकर्षक ऑफर्स, बनावट जाहिराती आणि फसव्या लिंकच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करत आहेत.
फसव्या ऑफर्सपासून सावध राहा
दिवाळीच्या काळात '50 टक्के सूट', 'फक्त 10 मिनिटांत खरेदी करा', 'मर्यादित कालावधीसाठी ऑफर' अशा संदेशांचा सुकाळ असतो. घाईघाईत अशा ऑफर्स स्वीकारल्यास वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याचा तपशील सायबर गुन्हेगारांच्या हाती लागण्याची शक्यता असते. त्यानंतर खात्यातील रक्कम काढून फसवणूक केली जाऊ शकते.
'डिअर कस्टमर', 'क्लायंट' किंवा 'युजर' अशा संबोधनाने येणारे संशयास्पद ई-मेल आणि संदेश यांना उत्तर देण्याऐवजी डिलीट करावेत. ई-मेल कोणाकडून आला आहे, याची खात्री करूनच त्यातील लिंक उघडावी. अनोळखी लिंक किंवा फाइल्सवर क्लिक करणे टाळावे.
कॅश ऑन डिलिव्हरीला प्राधान्य द्या
ऑनलाइन खरेदी करताना सुरक्षित संकेतस्थळांचा वापर करावा. संकेतस्थळाच्या पत्त्यात 'HTTPS' आणि सुरक्षिततेचे चिन्ह असल्याची खात्री करावी. व्यवहारासाठी सुरक्षित पेमेंट गेटवेचा वापर करावा. शक्यतो 'कॅश ऑन डिलिव्हरी' हा पर्याय निवडावा. ऑनलाइन पार्सल स्वीकारताना संबंधित कुरियर कर्मचाऱ्यासमोर त्याचा संपूर्ण व्हिडिओ तयार करावा, असा सल्लाही पोलिसांनी दिला आहे.
फसव्या जाहिरातींचा सुकाळ
दिवाळीनिमित्त विविध वेबसाइट्स आणि अॅप्सवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात असल्याचे भासवले जाते. मात्र, त्यातील काही जाहिराती बनावट असू शकतात. अनोळखी लिंक, फाइल किंवा संशयास्पद ऑफर्सना प्रतिसाद दिल्यास आर्थिक नुकसान होण्याबरोबरच वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याचा धोका आहे.
'दिवाळी सणाच्या निमित्ताने फसव्या जाहिरातींचा सुकाळ सुरू आहे. नागरिकांनी अनोळखी लिंक किंवा फाइल उघडू नयेत. आकर्षक ऑफर्सच्या मोहात पडून घाईघाईने व्यवहार करू नयेत,' असे सायबर पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी सांगितले.
दिवाळीचा आनंद साजरा करताना ऑनलाइन खरेदीच्या मोहात आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
