वाढत्या गुन्ह्याबाबत डीबी पथकाची एसपीनी केली कानउघडणी! गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याचे दिले आदेश
पोलीस अॅक्शन मोडवर
राजेंद्र होळकर कोल्हापूर
मागील काही महिन्यापासून शहरातील चौका-चौकात हाणामाऱ्या, घरफोडी, दुचाकीची चोरी यासह दोन गटातील वर्चस्ववादावऊन शहरात पाच तर जिह्यात सहा महिन्यात तीस खून झाले. तर दोन ठिकाणी मंदिरात दागिणे चोरट्यांनी लंपास केले. गांजा, हुक्कापार्टी आणि ओपन बार नित्याचे बनले आहे. जिह्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शहरातील चार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकांची (डीबी) गुरूवारी कानउघडणी करत गुन्हा निर्गीतीकरण करण्याबाबत कडक सुचना दिल्या.
शहरासह उपनगरातील बंद घरे, बंगले हेऊन, चोरट्यांनी त्या घरांच्या, बंगल्याच्या दरवाज्याची कडीकोयंडा आणि कुलुपे तोडून आत प्रवेश करून, घरे या बंगल्यामधील रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेला जात आहेत. चोरट्यांनी घरे, बंगल्याबरोबर मंदिराकडे आपला मोर्चा वळवून, मंदिरामधील चांदीच्या मौल्यवान दागिण्याची चोरी होवू लागली आहे. तसेच चोरी करीत असलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद देखील झाले आहेत. तरीसुध्दा पोलिसांना चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यास यश आले नाही. अशा या घरफोडीच्या गुन्ह्याबरोबर वाहन चोरी विशेषत: दुचाकी चोरी जाण्याच्या प्रमाणात ही दिवसेंदिवस वाढ होत आहे.
घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्हा बरोबर शहरात छुप्या मार्गाने गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. त्यातून तरूणाईची गांज्या पार्ट्या मोकळ्या जागेवर या पडीक इमारतीमधून झडू लागल्या आहेत. हे धक्कादायक प्रकार पोलिसांच्या कारवाईमधून अनेकदा उघडकीस आले आहेत. तसेच गांज्याच्या नशेत धुंद होवून शहरासह उपनगरात खून, मारामाऱ्या होवू लागल्या आहेत.
गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या चोऱ्या, मारामाऱ्या, खून, खूनी हल्ल्यासारख्या घटनामुळे पोलिसांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले आहे. यांची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी गुरूवारी सकाळी शहरातील शाहुपुरी, राजारामपूरी, जुना राजवाडा, लक्ष्मीपूरी या चार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकांतील (डीबी) पोलीस कर्मचाऱ्यांची शाळा घेतली. या शाळेत त्यांनी चारही पोलीस ठाण्याच्या डीबी पथकांतील पोलिसांची चांगलीच कानउघडणी केली. जुलै महिन्याअखेर पर्यंत घरफोडी, वाहन चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावावा. तसेच अवैधपणे गांज्याची तस्करी करणाऱ्याचा शोध घेवून, गांजा विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळा, अन्यथा कारवाई केली जाईल असा सज्जड दम पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला.
पोलीस अधीक्षकांनी घेतली डीबीची कार्यशाळा
शहरात गेले अनेक दिवसांपासून विविध प्रकारच्या चोरीच्या घटना घडत आहेत. काही घटना रात्री तर काही घटना दिवसाढवळ्या घडत आहेत. त्याचबरोबर वाहन चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. तसेच शहरात छुप्या मार्गाने गांज्याची विक्री होत असून, गांज्याच्या नशेत धुंद होवून खून, मारामाऱ्या होवू लागल्याने, नागरीकांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. यांची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी गुऊवारी शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकांतील पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेत, चांगलीच कानउघडणी केली.