सोन्याचे दागिणे पॉलिशच्या बहाणाने भामट्याचा साडेचार तोळ्याच्या दागिण्यावर डल्ला
शहरालगतच्या खोतवाडीतील घटना; शहापूर पोलीस ठाण्यात नोंद
इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरालगतच्या खोतवाडी येथे एका भामटयाने सोन्याचे दागिने पॉलिश करुन, देण्याच्या बहाण्याने सव्वा दोन लाख रुपये किमतीचे साडे चार तोळे सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला. या फसवणूक प्रकरणी छाया धर्मेंद्र काबळे (रा. शिंदे मळा, खोतवाडी) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
छाया कांबळे ही महिला एकटीच घरी असल्याची संधी साधून भामट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांना तुमचे चांदीचे दागीने पॉलीश करुन देतो, असे सांगून चांदीचे पैंजण जोडवी व अंगठ्या असे दागिणे पॉलीश करुन दिले. या विश्वास बसल्यानंतर त्याने या महिलेला सोन्याचे दागिणे सुद्धा पॉलीश करून देतो, असे सांगितले. त्यामुळे कांबळे या महिलेने त्याला १ लाख ५० हजार रुपये किमतीचे जुने तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण आणि ७५ हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे जुनी जोंधळी पोतमणी माळ हे दागिणे पॉलीशसाठी दिले. त्यानंतर भामट्याने भांड्यातून गरम पाणी घेवून येण्यास सांगितले. या गरम पाण्यात कसले तरी केमीकल टाकले. त्यामध्ये तीन तोळ्याचे गंठण आणि दिड तोळ्याचे जोंधळी पोतमणी माळ त्या भांडयात पॉलीश करण्याकरीता ठेवल्यासारखे करुन, भांडयात दागिने न घालता हात चलाखी करीत स्वतःकडे ठेवले. थोड्या वेळाने या भांड्यातील दागिने काढून घ्या, असे सांगून भामट्याने पोबारा केला. कांबळे या महिलेने थोड्यावेळाने भांड्यात पाहिले असता त्यामध्ये दागिने नसल्याचे त्यांना दिसून आहे.