Kolhapur Crime News: काढ ए़डका, माजव दहशत, कोल्हापुरात उपनगरातील चित्र, नागरिकांत भिती
शेखोरांवर पोलिसांचा वचक उरला नाही का, नागरिकांतून प्रश्न उपस्थित होत आहेत
By : धीरज बरगे
कोल्हापूर : शहरात जरा काही झाले की लगेच ‘काढ एडका; माजव दहशत’ अशी परिस्थिती दिसून येत आहे. विशेषत: उपनगर परिसरात एडका गँगचा वावर वाढल्याचे दिसत आहे. गांजा, दारू, नशेच्या गोळ्यांच्या धुंदीत मिसरुड न फुटलेले तरुण भाईगिरी करत आहेत. त्यातून जीवावर बेतणाऱ्या घटना घडत आहेत.
कळंबा येथे फोडलेली आराम बस, फुलेवाडी रोडवरील बेकरीवर एडका गँगचा हल्ला, तसेच रिंगरोड परिसरातील खून या प्रकारांमधून ही दहशत स्पष्टपणे जाणवते. यामुळे जे सामान्यांना कळते ते पोलिसांना कळत नाही का, नशेखोरांवर पोलिसांचा वचक उरला नाही का, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.
उपनगरातील वावर वाढला
आर. के. नगर, कंदलगाव, पाचगाव, कळंबा, जिवबानाना जाधव पार्क, फुलेवाडी रिंगरोड परिसर झपाट्याने विस्तारत आहे. येथील निर्जन भागात नशेखोर दिवसभर वावरतात. चाकू, एडका शस्त्रs बाळगून कोणी विरोध केल्यास उगारतात. येथे गस्त वाढविण्याची गरज आहे.
राजेंद्रनगर-पाचगाव वाद पेटला
राजेंद्रनगरमधील गट व पाचगाव परिसरातील म्होरक्या गटात दीड महिन्यांपासून धुसफूस सुरू आहे. पाचगावच्या गटाने राजेंद्रनगरमध्ये जाऊन दहशत माजवली, तर राजेंद्रनगर गटाने प्रत्युत्तरादाखल पाचगावात मोर्चा काढला. अद्याप या दोन्ही गटात तणाव कायम आहे.
खऱ्या ‘भाई’चा दाखला द्या
पोलिस मित्र, पोलीस पाटील यांच्या माध्यमातून पोलिसांचे नेटवर्क असतानाही या हालचालींची माहिती मिळत नाही, हे नागरिकांना पटत नाही. सोशल मीडियावरही भाईंची अकाऊंट्स असून त्यावरून चिथावणीखोर स्टेटस टाकले जात आहेत. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष दिसत आहे. उपनगरात फोफावत असलेल्या या भाईगिरीवर पोलिसांनी वचक निर्माण करून खरा ‘भाई’ पोलीसच असल्याचे दाखवून द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
गांजाचा खुलेआम धंदा
- राजेंद्रनगर ते फुलेवाडीपर्यंत गांजा विक्री व सेवनाचे प्रकार खुलेआम सुरू आहेत.
- कळंबा तलाव सांडव्याजवळील ‘बाबळी’ नावाच्या ठिकाणी पहाटे गांजाच्या पुड्या भरण्याचा व्यवसाय चालतो.
- जरगनगर कमानीजवळील ‘बनात’ येथे गांजा पॅकिंग, विक्री व सेवन सुरू आहे.
- एनसीसी भवनमागील भाग, रामानंदनगर पूलाजवळही एका पानपट्टीत गांजा विक्री होते.
पंधरा दिवसांत तीन घटना
- 3 सप्टेंबर : फुलेवाडी रोडवरील बेकरीवर एडका, दगडफेक करून दहशत.
- 7 सप्टेंबर : कळंबा परिसरात आराम बसवर हल्ला; काचा फोडल्या,
- चालकावर चाकूने वार (सुदैवाने तो बचावला).
- शनिवारी मध्यरात्री : फुलेवाडी रिंगरोड येथे आठ-दहा जणांकडून पाठलाग करून एका तरुणाचा निर्घृण खून.