Kolhapur Crime News :दुचाकीमधून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक
८० हजारांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : शहरात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून अर्धा किलो गांजा, एक मोपेड, दोन हजार रुपये, दोन मोबाईल असा सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कुणाल किरण सांगवडेकर (वय २५, रा. योगेश्वरी कॉलनी, पाचगाव), भूषण रंगराव पाटील (वय २२, रा. पोवार कॉलनी, पाचगाव कॉलनी) अशी त्यांची नावे आहेत. गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हॉकी स्टेडियम परिसरात ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हॉकी स्टेडियम येथील महापालिकेच्या बंद इमारतीमध्ये गांजाची विक्री सुरु असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली होती. गुरुवारी सायंकाळी जुना राजवाडा पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता, भूषण आणि कुणाल गांजा विक्री करत असल्याचे दिसून आले.
त्यांना ताब्यात घेऊन मोपेडची तपासणी केली असता, त्यामध्ये अर्धा किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी या दोघांनाही अटक करून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील प्रशांत पोलप, अमर पाटील, सागर डोंगरे यांनी ही कारवाई केली.
- कळंब्यातील गण्याचा शोध सुरू
भूषण १२ वी पास असून तो काहीही काम धंदा करत नाही, तर सांगवडेकर फॅब्रिकेशनचे काम करतो. जादा पैसे कमावण्यासाठी हे दोघेही गांजा विक्री करत असल्याची माहिती समोर आले आहे.
या दोघांनीही कळंब्यातील गण्याकडून गांजाची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. जुना राजवाडा पोलीस गण्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पाचगाव येथील आणखीन काही जणांची चौकशी सुरु आहे.