डोक्यात बाटल्यांचा क्रेट घालून मजूराचा खून! दारु पिण्यातून मित्रांच्यात वाद, रेकॉर्डवरील गुन्हेगार ताब्यात
कोल्हापूर प्रतिनिधी
दारुपिण्यासाठी बसलेल्या मित्रांमध्ये मोबाईलवरुन झालेल्या वादातून मजूरी काम करणाऱ्या तरुणाचा डोक्यात सोड्याच्या बाटल्यांचा क्रेट घालून निर्घुण खून करण्यात आला. विनायक विश्वास लोंढे (वय 32 रा. शाहू कॉलेज, सदरबाझार) असे मृताचे नांव आहे. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दाभोळकर कॉर्नर येथील पादचारी पुलाखाली ही घटना घडली. दरम्यान या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर युनुस मणेर (वय 35 रा. विक्रमनगर) याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विनायक लोंढे याच्या आई-वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले असून, तो शहरात भटकून मिळेल ते मजुरीचे काम करून उदनिर्वाह करीत होता. त्याचा भाऊ नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहतो. सोमवारी रात्री तो मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पादचारी उ•ाणपुलाजवळ असलेल्या एका सोडा वॉटरच्या गाडीजवळ मित्र समीर मणेर याच्यासोबत मद्यप्राशन करीत बसला होता. त्यावेळी दोघांमध्ये मोबाइलवरून वाद झाला. याच वादातून दोघांमध्ये झटापट झाली. मणेर याने जवळ असलेल्या सोड्याच्या आणि दारूच्या बाटल्या डोक्यात मारल्याने लोंढे खाली कोसळला. मारहाणीचा प्रकार पाहून धावत आलेला रिक्षाचालक जावेद अजीज मणेर (रा. कदमवाडी) याने रुग्णवाहिकेतून लोंढे याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, पोलीस उपनिरीक्षक शेळके, सहाय्यक फौजदार संदीप जाधव, रवि आंबेकर, बाबा ढाकणे यांच्यासह शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी व सिपीआर रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी तातडीने हल्लेखोर मणेर याला ताब्यात घेतले. दारूच्या नशेत झालेल्या वादातून लोंढे याचा खून झाला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली. हल्लेखोर मणेर याच्यासोबत अन्य काही साथीदार होते काय, याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद करण्याचे काम सुरू होते.
आई वडीलांचा मृत्यू, आणि घटस्फोट
विनायकच्या आई वडीलांचे 5 वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्याचा भाउ पुणे येथे स्थायीक आहे. विनायकचे चार वर्षापूर्वी लग्न झाले होते. यानंतर विनायक व त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला आहे. यानंतर विनायक दारुच्या आहारी गेला होता.
पडेल ते काम करुन उदरनिर्वाह
विनायक दारुच्या आहारी गेल्यामुळे तो एका ठिकाणी कामास नव्हता. गेल्या काही वर्षापासून मध्यवर्ती बसस्थानक परिसरातच तो राहत होत. अपवादात्मक वेळाच तो घरी जात होता. याच परिसरात मिळेल ते काम करुन तो आपला उदरनिर्वाह करत होता. रंगकाम, रिक्षाचालवणे, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील हातगाड्यांवर पडेल ते काम करुन तो आपला उदरनिर्वाह चालवत होता.
समीर मणेर रेकॉर्डवरील गुन्हेगार
विनायक लोंढेच्या खून प्रकरणी अटक केलेला समीर मणेर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तीन महिन्यापूर्वी शाहूपुरी पोलिसांनी त्याला मोटारसायकल चोरीच्या गुह्यात अटक केली होती. त्याच्यावर मोटारसायकल चोरीसह इतर गुन्हे दाखल आहेत.